
स्थैर्य, 4 जानेवारी, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : महाराष्ट्रात साहित्यसंस्थांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट आहे. भाषेसाठी साहित्यसंस्था, लेखक आणि शासन यांनी असे एकत्रित प्रयत्न करत आहेत, हे चित्र दिलासादायक आहे. भाषेसाठी हे अनुकूल वातावरण आहे. भूमी सुपिक असल्याचे हे लक्षण आहे, अशा अनुकूल वातावरणात भाषेचा विकास होत राहो, अशा शुभेच्छा ज्ञानपीठ सन्मानप्राप्त साहित्यिक प्रा. रघुवीर चौधरी यांनी दिल्या.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील समारोप समारंभात प्रा. रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी साहित्य संमेलनाच्या दीर्घ परंपरेचाही प्रा. रघुवीर यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. ही परंपरा वर्धिष्णु होत राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
गुजराती भाषेत पाळणा..
महाराष्ट्रातील नेते दीर्घ भाषणेही उत्तम करतात, अशी टिप्पणीही रघुवीर यांनी याप्रसंगी केली. ते म्हणाले, सातारा जिल्हा शिवाजी महाराजांशी संबंधित आहेच, पण गुजरातमधील सौराष्ट्राचाही शिवाजी महाराजांशी संबंध आहे. सौराष्ट्रातील एक कवी जव्हेरचंद मेघाणी यांनी बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेत पाळणा रचला आहे. बालशिवाजीला झोप यावी, म्हणून अंगाईगीत गाणाऱ्या जिजा मातोश्रींच्या मुखी हा पाळणा आहे. १५०० मैलांचे भौगोलिक अंतर असूनही, या अंगाईगीताने महाराष्ट्रापासून सौराष्ट्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गुजराती भाषेत बरेच लेखन झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महानायक कादंबरीचे कौतुक..
मी यापूर्वी आंतरभारतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात आलो होतो. सानेगुरुजी आणि विनोबाजी यांनी तुरुंगवासात गीताप्रवचनांची निर्मिती केली. मीही तेव्हा त्यातून प्रेरणा घेत एक दीर्घकविता लिहिली होती, अशी आठवण रघुवीर यांनी सांगितली. सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या महानायक कादंबरीचे रघुवीर चौधरी यांनी विशेष कौतुक केले. अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे विलक्षण कार्य केले, त्यांचे तपशील पाटील यांनी संशोधन – अभ्यासातून वाचकांसमोर ठेवले आहेत. मी या कादंबरीचा गुजराती अनुवाद वाचला आहे आणि प्रभावित झालो. विश्वास पाटील यांची भेट घेणे, हाही महाराष्ट्रात येण्याचा एक हेतू होता, असे त्यांनी सांगितले.
शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणार : विश्वास पाटील
साताऱ्याचे दोन महाराज माझे फार आवडते आहेत. एक थोरले शाहू महाराज आणि दुसरे प्रतापसिंह महाराज. थोरले शाहू महाराज यांच्यावर संशोधनात्मक लेखन करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करेन, असे आश्वासन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात विश्वास पाटील बोलत होते. यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या थोरवी विषयी बोलताना समाजमाध्यमावर अपप्रचार करणाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली. ते पुढे म्हणाले, मराठी माणसाच्या जिव्हाळाचा विषय असणाऱ्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांची समाधी कर्नाटकात आहे. तिची अवस्था फार वाईट आणि बिकट आहे. त्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. कोट्यवधी रपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आपण बांधतो पण त्यांच्या पित्याच्या समाधीची दुरवस्था होणे ही लाजिरवाणी बाब आहे.
मराठीसाठी रस्त्यावरही लढाई लढू..
मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेविषयी बोलताना ते म्हणाले, मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस टिकावा, वाढवा आणि समृद्ध व्हावा यासाठी आपण वेगळा विचार करायला हवा. आपल्या वापरात ही भाषा आवर्जून राहील याचा कटाक्ष मराठी माणसाने पाळला पाहिजे. आपण साहित्यिक आणि सहिष्णू पद्धतीने ही लढाई लढत आहोत. पण गरज पडली तर माय मराठीसाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरून लढू शकतो, हे दाखवून दिले आहे. माय मराठीच्या अस्तित्वासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई पण लढायला तयार आहोत.
अपूर्ण माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी समाज माध्यमांवर मुक्ताफळे उधळणाऱ्या ट्रोलर्सची कान उघाडणी करताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी लिहिताना, बोलताना मी प्रचंड अभ्यास केलेला असतो. पण हल्ली लोक त्यावर व्यक्त होताना कोणतीही माहिती न घेता उगाच बडबडत असतात. त्यामुळे वातावरण बिघडत आहे; असहिष्णुता पसरत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अनेक साहित्यकृतीतून विष पसरवले गेले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवाजी सावंत यांची ‘छावा’ आणि माझी ‘संभाजी’ ही कादंबरी महत्वाची ठरली. आमच्या या योगदानाची कोणी दाखल घेणार आहे की नाही? असा खडा सवालही त्यांनी केला.

