दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । पुणे । महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिलांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासोबतच महिला शक्तीचा सन्मान व्हावा व त्यांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. एसएनडीटी महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.मुक्ताजा मिटकरी, चर्चगेट एसएनडीटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, डॉ. दिनेश परदेशी, भरत राजपुत उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध योजना योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनी, तरूणी, नोकरी करणारी महिला,वयोवृद्ध महिला,गृहीणी आदींना स्वावलंबी व आत्मविश्वासाने जीवन जगण्याची उर्मी मिळत आहे. ग्रामीण भागात बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम प्राधान्याने सुरू आहे.
एसएनडीटी महाविद्यायालतील होम सायन्स विभागाच्या मदतीने महिलांना विविध क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. राज्यातील महिलांना सक्षमीकरण तसेच रोजगाराचे धडे देण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. या महाविद्यालयाची देशभर ओळख आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक सोईसुविधा मिळाव्यात तसेच महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर लवकरण बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोना कालावधीत महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून श्री.सत्तार म्हणाले, राज्यात कोरोना कालावधीत कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच उपाययोजना करण्यात अनेक महिला सरपंच, नगराध्यक्षा तसेच विविध क्षेत्रातील महिलांनी अनेक नाविण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे योगदान महत्तवूपर्ण असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
प्राचार्य डॉ.मुक्ताजा मिटकरी यांनी एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची तसेच अभ्यासक्रमाची माहिती दिली.
यावेळी महविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.