नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठाम – पालकमंत्री शंभूराज देसाई

गोंदवले बु, लोधवडे, पिंपरी व म्हसवडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी


स्थैर्य, सातारा, दि. 30 सप्टेंबर : अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरासर परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी बाधितांनी खचून जावू नये. शासन तुमच्या पाठीशी ठाम आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळेल अशी ग्वाही देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी अतिवृष्टीमुळे माण तालुक्यातील गोंदवले बु, लोधवडे, पिंपरी व म्हसवड शहरातील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. या पहाणी प्रसंगी प्रांताधिकारी उज्वला गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अतिवृष्टी बाधीत कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरातील दुकांनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. तसेच परिसरातील शेती, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे तातडीने करावे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करावा.

अतिवृष्टी बाधितांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशीही ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी अतिवृष्टी बाधितांना दिली. या दौर्‍यात त्यांनी विविध ठिकाणी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. उध्वस्त झालेल्या पिकांकडे अत्यंत केविलवाण्या, उदासवाण्या नजरेने पहात शेतकर्‍यांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या. या दौर्‍यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उध्वस्त झालेल्या कोबी, कांदा, मका आदी पिकांची पाहणी केली, नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनाला ते तातडीने सादर केले जातील शासनाकडून दिवाळीपूर्वी मदत उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकर्‍यांना दिला.
या दौर्‍यात त्यांच्यासोबत संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते त्यांना त्यांनी त्यांच्या विभागाशी निगडित पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!