दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री. दामले यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करताना मुख्यमंत्री बोलत होते.
नाट्यसृष्टीत नाटकांचे तब्बल १२ हजार ५०० प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री. दामले यांचे अभिनंदन केले.
प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्याला उत्तर देताना प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याबाबतच्या शिफारशीचा प्रस्ताव मागणी करण्याअगोदरच केंद्र सरकारला पाठवला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबई- ठाण्यामध्ये नवीन चित्रनगरी
कलावंतांना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
राज्यातील नाट्यगृहांची दुरुस्ती करणार
राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
केंद्राकडून राज्याला दोन लाख कोटींची आर्थिक मदत
राज्याला केंद्राची साथ मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी सव्वा दोनशे प्रकल्पांना दोन लाख कोटी रुपये अनुदान, आर्थिक मदत केलेली आहे. यामुळे कुठलेही प्रकल्प आता थांबणार नाहीत. राज्यातील प्रकल्पांना केंद्र सरकारची आता तात्काळ मंजुरी मिळत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाण्यात पूर्ण शो पाहणार
लोकांच्या भेटीगाठी, गाऱ्हाणी आणि भावना ऐकण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने नियोजित कार्यक्रमांना पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या प्रयोगाचा पहिला भाग पाहायला मिळाला नाही. या प्रयोगाचा शो ठाण्यातही होणार आहे, तो पूर्ण पाहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
थोडा वेळ द्या…
राज्यात एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. हे जनतेचे, सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आमच्या सरकारला तीन महिने झाले आहेत. आणखी लोकहिताची कामे करायची आहेत, थोडा वेळ द्या, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी नाट्यसृष्टीबद्दल बोलताना जसे विष्णूदास भावे यांचे नाव घेतले जाते, तसे आता प्रशांत दामले यांचे नाव घेतले जाईल. कलेची सेवा ते सातत्याने करतात. समर्पित भावनेने काम करणाऱ्या कलावंतांचा सन्मान होत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता १२, ५०० प्रयोग झाले, भविष्यात २५ हजार प्रयोग करावे. नाटकाचा निखळ आनंद लुटला असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.