शासनाने यशवंतराव चव्हाणांच्या नावे राष्ट्रीय मराठी साहित्य अकादमी सुरु करावी : रविंद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । फलटण ।  ‘‘मराठी भाषा समृद्धी व संवर्धन यासाठी नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना भरीव योगदान दिले होते. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्‍वकोष निर्मिती मंडळ, लोकसाहित्य समिती, राज्य मराठी विकास संस्था आदींची निर्मिती झाली. त्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी वेगाने कार्य सुरु झाले. तथापि त्यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांच्या नावे ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय मराठी साहित्य अकादमी’ शासनाने सुरु करावी’’, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कथाकथनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. प्रसिद्ध कवी प्रा.संजय पवार यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘‘मराठी भाषा व्याकरणाने शुद्ध, अतिशुद्ध, प्रमाण या वादात न पडता बोली भाषेचे अस्सल गावरानपणसुद्धा स्वीकारले पाहिजे. कारण बोली मराठी भाषासुद्धा समृद्ध आहे. म्हणून त्यासह नव्याने मराठी भाषा शब्दकोष तयार केला पाहिजे’’, अशी अपेक्षा व्यक्त करुन बेडकिहाळ पुढे म्हणाले, ‘‘आपल्या देशात जगातल्या इतर देशांच्या वकिलाती आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत उत्कृष्ट मराठी ग्रंथांची भाषांतरे त्यात्या देशात गेली पाहिजेत व त्या त्या देशांचे साहित्य मराठीत आणता येईल अशी व्यवस्था झाली तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची जागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक देवाण घेवाण होईल. विविध देशांशी आपल्या असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाच्या भाषा विभागाने पाठपुरावा केला पाहिजे व राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली पाहिजे’’, अशी मागणी बेडकिहाळ यांनी केली.

पिंपरी चिंचवड मसाप शाखेचे अध्यक्ष प्रसिद्ध गीतकार राजन लाखे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले व शाखेच्या दोन वर्षाच्या कोरोना काळातील साहित्यिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रसिद्ध कथाकथनकार बबन पोतदार, निलीमा बोरवणकर, डॉ.राजेंद्र माने, विनिता ऐनापुरे यांनी आपल्या भावपूर्ण कथा सादर करुन या कार्यक्रमाची उंची वाढविली. रजनी सेठ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसाप शाखेच्या कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे, कार्यवाह संजय जगताप व कार्यकारी मंडळ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!