स्थैर्य, फलटण, दि.१७: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारातील २० ते २५ रुपये किलो मिळणारा कांदा आता ४५ ते ५० रुपये किलो झाला आहे. या मध्ये शेतकऱ्यांचा काहीही फायदा होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने कांदा वरील निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेली आहे.
महाराष्ट्र मध्ये आलेल्या पुराने व पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे बाजारात कांद्याची किंमत वाढून शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा न होता दलालांना किंवा व्यापाऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवावी असेही माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे.