लोककलाकारांना शासनाने मदत करावी : खा. उदयनराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 1 : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून अ,ब,क आणि ड श्रेणीनुसार कलाकार मानधन दिले जाते. सदरचे मानधन कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वितरित करण्यात आलेले नाही. ते त्वरित वितरित करावे. भविष्यात हे मानधन नियमित वेळेत मिळावे, राज्यातील नाट्यगहे आणि ग्रंथालये पुरेशी सुरक्षा घेवून सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासह तमाशा-बारी लोककलावंतांचे दैनंदिन जीवन कोरोनामुळे असह्य झाले आहे. त्याकरिता लोककलाकारांना शासनाने भरीव मदत करावी अशा मागण्या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.

राज्य शासन ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता श्रेणीनुसार ठराविक मानधन प्रदान करत असते. तथापि हे मानधन कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित ज्येष्ठ कलाकार व्यक्तींना वितरित करण्यात आलेले नाही. सदरचे मानधन तोकडे असले तरी मावळतीचा सूर्य बघत असलेल्या ज्येष्ठ कलाकारांना त्याचा मोठा आधार असल्याने हे मानधन एकरकमी, राज्यभरातील सर्व संबंधितांना तातडीने प्रदान करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच  राज्यातील नाट्यगृहे तसेच ग्रंथालये सध्या गेल्या 100 पेक्षा जास्त दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नाट्यकलाकारांवर तसेच नाट्य कंपनीवर अवलंबून असलेल्या सर्वांवर जवळजवळ उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील बहुतेक सर्व व्यवहार टप्याटप्याने सुरू करण्यात येत असताना तसेच सिनेमा आणि मालिकांना शासनाने चित्रीकरणाची परवानगी दिली असल्याने, नाट्यगृहामध्ये  नाटकांचे प्रयोग  आणि ग्रंथालये सुरू करण्यास विशेष दक्षता घेवून परवानगी देण्याबाबत यथोचित कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून नाट्यक्षेत्रावर अवलंबून असणार्‍या सर्व घटकांना दिलासा मिळेल आणि अनलॉक-2 च्या काळात ग्रंथालये सुरू झाल्याने नागरिकांना अधिक सोयीचे होईल आणि सततच्या  लॉकडाउन आणि अनलॉक-1 मुळे तमाशा-बारी कलावंतांचे सध्या अतोनात हालअपेष्टा होत आहेत. पूर्वी राजाश्रय होता. सध्याच्या काळात लोकाश्रयावर या घटकांचे जीवन कसे बसे चालू होते. परंतु लॉकडाउनमुळे त्यांच्या व्यावसायिक कलेवर  बंदी आल्याने सध्या अशा घटकांना तातडीने शासनाने मदत करणे आवश्यक आहे. अन्यथा या लोककलाकारांवर कठीण प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे. या लोककलाकारांना तातडीने शासनाने आवश्यक ती आर्थिक, सामाजिक मदत प्रदान करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!