स्थैर्य, नांदेड, दि.१५: तेलंगणा राज्याच्या काठावर असलेल्या किनवटसारख्या तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी युवकांना आता महाराष्ट्र शासनाने पुढील शिक्षणासाठी नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत किनवट येथे चालविण्यात येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेची श्रेणीवाढ करुन संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा या आश्रमशाळेला देण्यात आलेला आहे.
या भागातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मुलांना अकरावी व बारावीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी व त्यांनाही विकासाच्या प्रवाहात घेता यावे असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन किनवट येथे ही मान्यता मिळवून घेतली.
आदिवासी युवकांना पुढील शिक्षणाची नवी संधी मिळाल्याचा आनंद
नांदेड जिल्ह्याची व्याप्ती ही इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठी आहे. या जिल्ह्यात विविध धर्माची लोकसंख्या आहे. काही तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. किनवट सारख्या तालुक्यातील युवकांना विकासाच्या संधी मिळण्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी आगोदर मिळणे आवश्यक होते. त्यादृष्टिने किनवट येथील आश्रमशाळेच्या श्रेणीवाढचा प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून विचारात होता. आदिवासी विभागाशी पाठपुरावा करुन आता याठिकाणी विद्यार्थ्यांना कला व विज्ञान या दोन्ही शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.