ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज : प्रांताधिकारी तथा निरीक्षक डॉ. शिवाजीराव जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. 15 : फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सध्या सुरु आहे. 6 ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या असून उर्वरित 74 ग्रामपंचायतींसाठी त्या त्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मतदान केंद्रावर आज शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत इव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निरीक्षक डॉ. शिवाजीराव जगताप, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 712 जागांसाठी 2408 उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्यापैकी छानणीत 26 उमेदवारी अर्ज अवैध ठरले तर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 6 ग्रामपंचायती व अन्य ग्रामपंचयतींमधील काही जागा बिनविरोध झाल्याने आता 574 जागांसाठी मतदान होत आहे.

फलटण तालुक्यातील 74 ग्रामपंचायती मधील 574 जागांसाठी 1255 उमेदवार निवडणूक आखाड्यात विविध पक्ष, संघटना, गट व स्वतंत्ररित्या निवडणूक आखाड्यात उतरले असून या सर्वांसह त्यांचे नेते, कार्यकर्ते, समर्थकांनी गेले 8/10 दिवस मतदारांना आपला उमेदवार कसा योग्य आणि त्यांना का निवडून द्यावे यासाठी जाहीर सभा, भेटी गाठी, कोपरा सभा वगैरे मार्गाने प्रचाराचा धुरळा उडविला, दि. 13 रोजी निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता आज शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वेळेत मतदान होणार आहे.

फलटण तालुक्यात 574 जागांसाठी 261 मतदान केंद्रांवर वरीलप्रमाणे मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी 66140 स्त्रीया, 71161 पुरुष असे एकूण 1 लाख 37 हजार 301 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस कर्मचारी असे प्रत्येकी 6 अधिकारी, कर्मचारी तसेच झोनल ऑफिसर व अन्य अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्व यंत्रणा मतदान केंद्रावर दाखल झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली आहे.

निवडणूका पारदर्शी व शांततेत पार पडणेसाठी पोलीस अधिकारी/कर्मचारी, गृहरक्षक दल, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल यांच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!