दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळावी याबाबतचा मुद्दा विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केला होता.
श्री.पवार म्हणाले, दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत जाहीर केली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालेले नाही. परंतु राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यात येतील, असेही श्री.पवार यांनी सांगितले.