दैनिक स्थैर्य | दि. ९ जुलै २०२३ | फलटण |
फलटण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिलेली आहे. तसेच शासनाची उच्चस्तरीय सचिव समिती व मंत्रीमंडळाने मान्यता दिल्यानुसार न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकानुसार १९ नियमित पदे व ५ मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास शासन निर्णय काढण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार फलटण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी १९ नियमित पदे अशी : जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश – १, अधीक्षक – १, लघुलेखक ग्रेड १ – १, वरिष्ठ लिपिक – ४, कनिष्ठ लिपिक – ९, बेलिफ – ३.
बाह्ययंत्रणेद्वारे घेण्याच्या ५ मनुष्यबळांच्या सेवा यामध्ये पुस्तक बांधणीकार – १, शिपाई – २, पहारेकरी – १, सफाईगार – १.
वरील नव्याने निर्माण केलेली पदे भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथमत: दि. ३१/०८/२०२३ पर्यंत चालू ठेवण्यास शासन मंजुरी देण्यात आली असून या पदांना ३१ ऑगस्टनंतर पुढील मुदतवाढ घ्यावी लागणार आहे.
शासनाकडून फलटण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी पदे भरण्याचा शासन निर्णय जारी झाल्यामुळे लवकरच या न्यायालयाचे कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.