लावंघर, समर्थगाव- काशीळ व भाटमरळी उपसा सिंचन योजनेच्या निविदा प्रक्रियेस शासनाची मान्यता

ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश; सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकर्‍यांना होणार फायदा


स्थैर्य, 6 जानेवारी, सातारा : उरमोडी धरणातील पाणी सातारा तालुक्यातील लावंघर, समर्थगाव- काशीळ व भाटमरळी या उपसा सिंचन योजनेद्वारे त्या- त्या भागातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून उरमोडी धरणाच्या मोठा पाटबंधारे सिंचन प्रकल्पांतर्गत लावंघर, समर्थगाव- काशीळ आणि भाटमरळी या तीन उपसा सिंचन योजनेच्या निविदा प्रक्रियेस शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तिन्ही योजना आता लवकरच मार्गी लागणार असून शेतकर्‍यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तीनही योजनांच्या निविदा प्रक्रियेला मान्यता दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

उरमोडी प्रकल्पांतर्गत परळी गावाजवळ कृष्णा नदीच्या उरमोडी या उपनदीवर 9.96 टी.एम.सी. क्षमतेचे धरण सन 2010 साली बांधून पूर्ण झाले असून त्या वर्षीपासून 100 % पाणीसाठा होत आहे. उरमोडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास दिनांक 07/12/2025 रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत रक्कम रु. 4414.28 कोटी किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या चतुर्थ सुप्रमानुसार सातारा तालुक्यातील 9756 हेक्टर, खटाव तालुक्यातील 9725 हेक्टर व माण तालुक्यातील 9725 हेक्टर असे एकूण 29206 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. उरमोडी प्रकल्पाच्या सुधारीत चतुर्थ प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास 10 डिसेंबर 2025 रोजी शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. चतुर्थ सुप्रमा प्रस्तावात समाविष्ट असलेल्या लावंघर, समर्थगाव- काशीळ आणि भाटमरळी या उपसा सिंचन योजनांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेस शासनाने मान्यता प्रदान केली असून त्यामुळे सातारा तालुक्यातील अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्मितीचा मार्ग सुकर झालेला आहे.

लावंघर उपसा सिंचन योजनेद्वारे सातारा तालुक्यातील लावंघर, शिंदेवाडी, म्हसकरवाडी, करंजे, करूण, अंबवडे या 6 गावांतील एकूण 355 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. उरमोडी- कण्हेर जोड कालव्याच्या सा क्र. 0/600 मी येथुन 136 मी. उंचीवर प्रस्तावित वितरण कुंडामधुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. यासाठी 250 अश्वशक्तीच्या 2 पंप (एकुण 500 अश्व शक्ती) बसविण्यात येणार असुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. या उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे रु. 39.81 कोटी एवढ्या खर्चाची तरतुद असुन ही उपसा सिंचन योजना मार्च- 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या निविदा प्रक्रियेस मान्यता मिळाल्यामुळे लावंघर परिसरातील 6 – गावांतील शेतक-यांची सिंचनासाठीची प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असणारी मागणी पूर्णत्वास जाणार आहे.

समर्थगांव व काशिळ उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या निविदा प्रक्रियेसही शासनाने मान्यता प्रदान केली असून त्यामुळे सातारा तालुक्यातील 720 हे. अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्मितीचा मार्ग सुकर झालेला आहे. समर्थगांव व काशिळ उपसा सिंचन योजनेसाठी रु. 56.26 कोटी एवढ्या खर्चाची तरतुद असुन या उपसा सिंचन योजना मार्च- 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. समर्थगाव उपसा सिंचन योजनेद्वारे सातारा तालुक्यातील समर्थगाव परिसरातील एकूण 345 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. खोडद बंधा-यावरून 100 मी. उंचीवर प्रस्तावित वितरण कुंडामधुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. यासाठी 215 अश्वशक्ती च्या 2 पंप (एकुण 430 अश्वशक्ती) बसविण्यात येणार असुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे.
काशिळ उपसा सिंचन योजनेद्वारे सातारा तालुक्यातील काशिळ गावांतील एकूण 375 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
खोडद बंधा-यावरुन येथून 111 मी. उंचीवर प्रस्तावित वितरण कुंडामधुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे.
यासाठी 215 अश्वशक्ती च्या 2 पंप (एकुण 430 अश्वशक्ती) बसविण्यात येणार असुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. तसेच भाटमरळी उपसा सिंचन योजनेच्या निविदा प्रक्रियेलाही शासनाने मान्यता दिली असून यामुळे या भागातील सिंचन क्षेत्रात वाढ होऊन येथील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. या तीनही योजनांच्या निविदा प्रक्रियेला मान्यता मिळाल्याने या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकर्‍यांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!