
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : राज्यातील प्रमुख रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत आणि नवीन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी मिळावी, या उद्देशाने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध रस्ते विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, मंत्री गडकरी यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीदरम्यान, राज्यातील, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची दळणवळणाची सोय सुधारण्यासाठी केंद्रीय रस्ता निधी (CRF) अंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात यावी, असे निवेदन मंत्री गोरे आणि निंबाळकर यांनी सादर केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांची त्वरित पूर्तता करण्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या भागातील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना उत्तम रस्ते सुविधा देणे हे आमचे प्राधान्य असल्याचे या नेत्यांनी सांगितले. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, सादर करण्यात आलेल्या सर्व मागण्यांवर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि विकास कामांना गती दिली जाईल, असे आश्वासन दिले.