फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत जाँ मार्क सेरे शार्ले यांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मूल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी. उभयपक्षी माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान स्त्री समानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत श्री. जाँ मार्क सेरे शार्ले यांनी उप सभापती डॉ. गोऱ्हे यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी जागतिक स्तरावर सुरु असलेले स्त्री समानता विषयक कार्यक्रम, उपक्रम, परिषदा याबाबत उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. फ्रान्समधील स्त्री समानता विषयक उपक्रमातील सहभागी गटनेत्यांना यावेळी मुंबई भेटीचे आमंत्रण देण्यात आले.

फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशातील स्त्री समानता विषयक कार्यक्रमांचे अभ्यासगट फ्रान्स वकिलातीच्या माध्यमातून परस्परांशी संपर्क आणि समन्वय साधून आहेत. त्‍यांची एक परिषद मुंबई येथे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती यावेळी महावाणिज्यदूत श्री. शार्ले यांनी दिली. या परिषदेत आपणही सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी दिले. स्त्री आधार केंद्र त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या स्त्री समानता आणि महिला सबलीकरण उपक्रमांची माहिती उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. “समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने” ही आपली पुस्तिका आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिला. या सदिच्छाभेटीप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव राजेश तारवी, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!