अलविदा शेख सर…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

‘बायोस प्लस लॉगस’ म्हणजे ‘बायोलॉजी’ याचा पहिला धडा ज्यांनी गिरवून घेतला आणि आयुष्यभरासाठी तना-मनावर गोंदवून ठेवला, ते आमचे शेख सर आज काळाच्या पडद्याआड गेले. या काळ्या पडद्याच्या त्या बाजूस जाऊन केमिस्ट्रीच्या प्रमेय एककांची, पेंटागॉन हेक्सागॉनची, नक्षा उतरवण्यासाठी कदाचित लागलीच त्यांनी खडू हाती घेतला असेल. पण वरच्या ओठावर खालचा ओठ दुमडून, खडूनी पांढरा झालेला उजवा हात आणि डाव्या हाताच्या बोटाने ढकलली जाणारी ती बट, आता आठवणीत जाऊन विसावली आहे. विचारांची मालिका खंडित होऊ नये यासाठी सिगारेटची राख पडताना होते तशी हलचाल वालां, तर्जनीने हातातल्या खडूवर धरलेला ठेका मात्र आजही आम्हाला तेवढ्याच ताकदीने नाचवू पहात आहे. गाण्याच्या पालूपदाप्रमाणे होणारे ‘मेटामॉर्फोसिस’सारख्या एखाद्या शब्दाचे वारंवार होणारे पुनरुच्चारण आणि समेवर येत पाठी येणारी त्याची ‘डेफिनेशन’ त्यांच्या तोंडून ऐकताना सुश्राव्य संगीत मैफिलीत बसल्याचाच भास होई. या बायोलॉजीच्या मैफिलीत प्रस्तुत होणार्‍या सुमधूर तालबद्ध अभंगाचा गायक आज आठवण सदरात जाऊन पोचला आहे.

विचारांची मालिका तुटू नाही म्हणून पहिल्याला, दुसरा, आणि मग पहिला दुसरा तिसरा, अशा शब्दांना एकापाठी एक बाहेर हकलत हकलत एखादी व्याख्या आमच्या वहीत टिपली जाई. त्यांच्या तोंडून ती ऐकताना अगदी ताना-हरकती घेतल्यासारखे वाटे. त्यामुळे जागेवरच ते इतके घोकले जाई की, परीक्षेत सरांच्या तोंडचा एक शब्द आठवायचा आणि त्या लयीत पुढचे सारे उत्तरपत्रिकेत उतरवायचे इतके सोपे होऊन जाई. अगदी स्त्रोत्र जसे एका शब्दावरून पुढच्या शब्दावर झेप घेते तसेच एकदा सरांसारखी लय सापडली की शब्दन्शब्द न विसरता आठवत आणि ते शब्द त्या व्याख्येतल्या स्वतःच्याच बाकड्यावर गपगुमान बसून रहात. फलटण आणि परिसरातून ऐशीनव्व्दच्या दशकातून बाहेर पडलेला प्रत्येक डॉक्टर, इंजिनिअर वा उच्चपदस्थ हा त्यांच्यात मुशीतून तयार झालेला असल्याने त्या कुठल्याही वहितले शब्द अन् शब्द आपापल्या बेंचवर शिस्तीत बसलेलेच सापडणार हे नक्की. सायन्स म्हणजे केवळ कष्ट हे त्रैराशिक खोटे पाडण्यासाठी त्यांनी स्वतः मात्र फार कष्ट घेतले. सकाळी म्हणजे हल्लीच्या पहाटे ६ वाजता चालू होणारा क्लास कधी एक मिनिट मागेपुढे होईल तर शपथ.

दुसर्‍या दिवसाची सरांची तयारी आदल्या रात्रीपासूनच सुरू होत असे. काळ्या कुळकुळीत फळ्यावर प्रमाणबध्द आणि अक्षरश: प्रिंट केल्यासारख्या ‘डायग्रामस’ एखाद्या पट्टीच्या चित्रकारालाही लाजवतील एवढ्या देखण्या असत. आपणच केलेली कलाकृती आपल्याच हातांनी पुसून परत तेवढ्याच तन्मयतेने पुढची डायग्राम काढणे हे येड्यागबाळ्याचे कामच नाही. नुसती डायग्राम बघितली तरी सारी थियरी आपसूक आठवू लागे. जी तर्‍हा बायोची तीच त्या केमिस्ट्रीची. त्याचे स्पेलिंग चुकू नाही म्हणून सर हमखास चेमिस्ट्री म्हणून सुरुवात करणार, हे ठरलेले. आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात कुठलाही केमिकल लोचां होणार नाही याची खबरदारी घेत घेत सगळ्या केमिकल रिअ‍ॅक्शन लिलया आमच्या डोक्यात घुसवायचे कसब त्यांच्या ठाई होते. ऑरगॅनिक केमिस्ट्री असो किंवा एलिमेंटटेबल सरांच्या पुढ्यात निमूटपणे मूग गिळणार हे ठरलेले. व्हायवा मधे आमच्या तोंडातून लय पकडून बाहेर पडणारे शब्द एक्झामिनरला हे प्रोडक्ट कुठलं आहे ते आपसूक सांगून जायचे.

पाच-साडेपाच फुटांचा हा चालता बोलता सायन्स वर्ग म्हणजे फलटण पंचक्रोशीत त्याकाळात असलेली कोटा फॅक्टरीच होती. गुडगे जवळ असल्याने पावलात पडलेलं अंतर झाकण्यासाठी अंगिकारलेली विशिष्ठ चाल घेऊन, ज्युनिअर कॉलेजच्या वर्गाबाहेर, पोरगेलासा वावर असला, तरी जरब या कानामात्रा वेलांट्या नसलेल्या तीनअक्षरी शब्दाला केवढा मोठा अर्थ आहे हे जाणवून देणारा जिभेचा पट्टा त्यांना लाभला होता. मुद्द्यागुद्द्यांना आणि लाथाबुक्क्यांना शर्मेनी मुंडी पडायला भाग पाडील, असा शाब्दिक चोप देणे ही तर सरांची खासियत होती. बास्केटबॉल असो, टेबल टेनिस असो, कुठल्याही टीमबरोबर सर असले की पालक वर्ग निर्धास्त व्हायचा. बाहेरगावी जाऊन, दिलेल्या खेळा व्यतिरिक्त, आपला पाल्य कुठलीही आणि इतर असलेली वाभ्री मेडल मिळवणार नाही याची खात्री त्यांना असायची. मुलात मूल होऊन वावरणारे सर अशावेळी अगदी जवळच्या मित्रासारखे भासायचे. पण तरीही आपला आब कायम राखून असायचे.

दिवसाच्या कुठल्याही वेळी भेटा, सरांची हेअर स्टाईल तसूभरही हलत नसे. पहाटे साडेपाच असो की रात्री नऊ, साडेनऊ सरांच्या अंगच्या इस्त्रीला कधीच गुढी पडलेली दिसली नाही. पॉलीश्ड राहणीमान, उत्साही तुकतुकीत चेहरा, बारीक हास्य घेऊन ही मूर्ती कायम ज्ञानदान चालवी. मुंबईला गेल्यावर उंच इमारतींना बघताना टोपी पडते बरका, अशा आशयाचे वाक्य घेऊन एखादा तास चालू झाला की, समजावे आज कोणाचा तरी आउट निघणार आहे. हवा गेलेल्याची मरगळ ज्या सहजतेने ते काढत, तेवढ्याच सहजी डोक्यात गेलेल्या हवेला पंक्चर करीत.

दिलीपकुमार म्हणजे सरांचे आराध्यदैवत. उत्कृष्ट खेळाडू म्हणून वेगवेगळ्या खेळात प्राविण्य. गझल आवडीचा विषय. कित्येक इंजिनिअर डॉक्टर आणि उच्चपदस्थ घडवल्याचा सार्थ अभिमान. दिमाखात वावरणे म्हणजे सरांसारखे असणे, हे एक सूत्रच डोक्यात बसले होते. मुंबईच्या गिरण्या झोपल्यावर एक युग संपुष्टात आले, तसे बदलत्या शिक्षण धोरणांनी फलटणच्या शिक्षण क्षेत्रातील या सुपरस्टारला लोळवले. क्लासेससाठी घेतलेली व्ही.आर.एस. सरांचा राजेश खन्ना करून गेली.

स्पर्धायुगाचा, स्पर्धापरीक्षांचा आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या बदललेल्या विचारसरणीचा मेळ घालणे सरांना जमले नाही. सरांना जमले नाही म्हणा किंवा सरांच्या आवाक्यात जाणे अलीकडच्या पिढीला झेपले नाही म्हणा, पण एकेकाळचे दिमाखात उभे असलेले ज्ञानगृह हळूहळू ओस पडू लागले. सायकली लावायला जागा मिळावी किंवा सरांच्या पायापाशी बसायला जागा मिळावी म्हणून बॅचच्या वेळेआधीच होणारी लगबग हळूहळू विरळ होत गेली. पेपरमधे छापून आलेल्या डायग्रामसवर प्रश्न विचारायची पद्धत चालू झाली आणि हाती डायग्रामस काढत काढत क्लीअर होत जाणारे कन्सेप्ट मारून मुटकून क्लीअर होऊ लागले. त्यामुळे थाड थाड उडणार्‍या एम.सी.क्यूं.च्या ए.के. फोर्टीसेवनच्या पुढ्यात थरो स्टडीवाला हा डायग्रॅमधारी भीष्म शरपंजरी पडला, हे मात्र खरं. सुपरस्टारचा दिमाख ते रया गेलेला नटसम्राट हा प्रवास घडताना काही वर्षांपूर्वी एका जीवघेण्या अपघातातून बचावलेले आमचे सर अपघाताच्या धक्क्यातून सावरलेच नाहीत आणि इहलोकीच्या फळ्यावर आपणच काढलेल्या फ्रॉग आणि हिब्बीसकसचा डायग्रॅम लक्ख पुसून सल्लाउद्दीन शेख सर परलोकीच्या एलिमेंट टेबलमधे समाविष्ट झाले.

– एम.बी.
१९ सप्टेंबर २०२४


Back to top button
Don`t copy text!