कोविडमध्ये मलकापूर पालिकेचे चांगले काम : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. 8 : गत तीन महिन्यांपासून कोरोनाच्या कालावधीत मलकापूरने अतिशय चांगले काम केले आहे. प्रशासनाच्या हातात हात घालून मलकापूरचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मलकापूर नगरपालिकेच्यावतीने  ना. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त कोविड-19 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या योध्यांचा सन्मान, शेतकर्‍यांना फळझाडे व बियाणे अनुदान वाटप, मोफत धान्य वितरण, महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना, वक्षारोपण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, मंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद  सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, सुरेश जाधव, वैशाली वाघमारे, विद्या थोरवडे, झाकीर पठाण, प्राचार्य प्रफुल्ल चव्हाटे, सलीम मुजावर, शंकरराव खबाले, नगराध्यक्षा सौ. नीलम  येडगे, मनोहर शिूंदे, पृथ्वीराज पाटील, हिंदुराव पाटील, राजेंद्र माने, आनंदी शिंदे, कमल कुराडे, राजेंद्र यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मध्यंतरी केंद्र सरकारने कोरोना बाबत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जगभरात सुमारे दोनशे देशांमध्ये कोरोनावरती लस शोधण्याचे काम सुरू आहे. एखाद्या औषधाबाबत संशोधन करण्याचे काम फार गुंतागुंतीचे असते. तयार झालेल्या लसीची सुमारे 30 हजार लोकांवर टेस्ट घेतली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे दीड वर्षांपासून पुढे पाच, दहा वर्षांपर्यंत चालते. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत आपल्या देशात कोरोनावरती लस उपलब्ध होईल हा दावा चुकीचा आहे. लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्री यांना भाषण करताना बोलण्यासाठीच हा खटाटोप असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मलकापूरमध्ये 24 बाय 7 नळपाणी पुरवठा योजना अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. परंतु ती योजना आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा करण्यास पुरेशी नाही. त्यामुळे उंडाळे प्रादेशिक योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी निधी मंजूर झाला आहे. या योजनेमुळे कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूरसह आजूबाजूच्या गावांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. कोरोनाबाबत भीती वाटते. पण काळजी घेतली पाहिजे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

एखाद्या जागेवर आरक्षण टाकणे सोपे आहे. पण ते विकसित करणे अवघड आहे. असे असले तरी मलकापूर नगरपरिषदेने आरक्षण टाकून तेथे सुसज्ज अशी भाजी मंडई सुरू केली आहे हे निश्‍चित कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, मनोहर शिंदे मलकापूर शहर वासीयांच्या सुरक्षेसाठी, शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांच्या सहकार्‍यांचे चांगले पाठबळ मिळत आहे. मलकापूरमध्ये स्वच्छता आणि सेवेचा संगम झाला आहे. या मातीत स्व. ना. आनंदराव चव्हाण व स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, स्व. भास्करराव शिंदे यांच्यासारखी अनेक मोठी माणसे जन्माला आली. त्यांनी या मातीची, येथील लोकांची सेवा केली. परिसराचा विकास केला. त्यांच्या विचारांचा वारसा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे पुढे चालवत आहेत.

ना. सतेज पाटील म्हणाले, मलकापूर म्हणजे विकासाचा पॅटर्न तयार झाला आहे. चांगले, सक्षम, विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व लाभले तर काय होऊ शकते, हे मलकापूरमध्ये आल्यानंतर लक्षात येते. शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या सर्व किंबहुना सरकारच्या पुढे जाऊन आणखी काही योजना मनोहर शिंदे यांनी मलकापूर मध्ये राबवल्या आहेत. नुसत्या राबवल्या नाहीत तर त्या योजनांमध्ये सातत्य ठेवून यशस्वी करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांची सध्या प्रकृती ठीक नसल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या भेटीला गेले होते. त्यांची विचारपूस केली. हा कृष्णाकाठचा गुणधर्म आहे. तो महाराष्ट्राने घेतला पाहिजे. सातारा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे हे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वप्न होते. ते आज साकार होताना दिसत आहे. या मेडिकल कॉलेजचा पाया पृथ्वीराज बाबांनी घातला आहे. आगामी कालावधीत हे कॉलेज लवकरच उभे राहील. त्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ना. सतेज पाटील यांनी सांगितले.

मनोहर शिंदे म्हणाले, मलकापूर शहरात विकासकामे करताना नेहमी पृथ्वीराज चव्हाण यांचा आम्हाला फार मोठा आधार आहे. त्यामुळे  शहरात विविध योजना राबवून त्या यशस्वी करू शकलो. हे करत असताना नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले.

नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे यांनी आभार मानले. यावेळी मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व मान्यवर उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!