स्थैर्य, फलटण : शासन स्तरावर किंवा कृषी खात्याकडे रब्बीचा तालुका अशी नोंद असलेल्या फलटण तालुक्यात गेल्या २/४ वर्षांपासून खरिपाची पिके समाधानकारक येत असून पुन्हा रब्बीही चांगली साथ करीत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या सोईनुसार पिके घेऊन बदलत्या निसर्गाचा लाभ घेतला यावर्षी खरीपासाठी चांगले वातावरण, उत्तम पाऊस पाणी लाभल्याने तालुक्यात खरिपाच्या पेरण्या ९०/९५ % पर्यंत पूर्ण झाल्या, पिके दर्जेदार आली मात्र आता पावसाने ओढ देताच खरीप पेरण्या वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असून बळीराजा धास्तावला आहे.
पावसाची ३५०/४०० मि. मी. इतकी अत्यल्प वार्षिक सरासरी असून आतापर्यंत २२४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे, फलटण तालुक्यात प्रामुख्याने नारळी पौर्णिमेनंतर परतीचा मान्सून बरसतो, त्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसावर फलटणची भिस्त असते, गेल्या २/४ वर्षात हा मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने खरीप समाधानकारक आले यावर्षी मात्र मान्सून पूर्व पाऊस पुरेसा झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या ९०/९५ % टक्के झाल्या मात्र आता खरिपाच्या पिकांना पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने चांगल्या आलेल्या खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.
फलटण तालुक्यात खरिपाच्या पेरण्या बागायती पट्टयापेक्षा जिरायती किंवा नव्याने धोम-बलकवडी कालव्याद्वारे पाणी मिळणाऱ्या भागात अधिक होतात तर याचवेळी बागायती क्षेत्रात आडसाली ऊसाच्या लागणींना वेग येतो यावर्षी बागायती पट्ट्यातील क्षेत्रासाठी नीरा उजवा कालवा तुडुंब भरुन वाहत होता मात्र त्याचवेळी मान्सून पूर्व पाऊस केवळ जमिनीची ओल टिकून राहील असा पडत असल्याने सऱ्या काढण्यावाचून ऊसाच्या लागणी रखडल्या होत्या, दरम्यान पावसाने उघडीप दिली त्याचवेळी कालवा बंद झाल्याने ऊसाच्या लागणी पुन्हा रखडल्या आहेत. आज कालवा सुरु झाला असला तरी केवळ पिण्याच्या पाणी योजनांसाठी ४ दिवस कालवा सुरु राहणार असल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले आहे.
दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली असली तरी होणारा पाऊस अद्याप पुरेसा नाही, अधिक पावसाची गरज आहे, तरच सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरु शकतील अशी आजची स्थिती आहे.
गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणी साठे कमी आहेत. गतवर्षी नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, नीरा-देवघर, गुंजवणी या नीरा खोऱ्यातील धरणात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ९८.०४ % पाणी साठा होता म्हणजे जवळपास सर्व चारही धरणे पूर्ण भरली होती शिवाय नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु होता, त्यापूर्वीही जवळपास प्रत्येक वर्षी हीच स्थिती राहिली आहे. यावर्षी मात्र आज नीरा खोऱ्यातील या चार धरणात केवळ ४५.४० % पाणी साठा असून आतापर्यंत पाऊस नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या २ दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने पाणी साठे वाढतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुमारे २३ टी. एम. सी. क्षमतेच्या भाटघर धरणात आज ४७.६० %, १३ टी.एम.सी. क्षमतेच्या नीरा – देवघर धरणात आज ३४.९२ %, १० टी.एम.सी. क्षमतेच्या वीर धरणात आज ४६.२६ %, आणि २.५ टी.एम.सी. क्षमतेच्या गुंजवणी धरणात आज ६२.४९ % पाणी साठा आहे.
भाटघर धरण परिसरात आज ३८ आणि काल ९० मि. मी. एकूण ३९८ मि. मी., वीर धरण परिसरात आज ६३ व काल २४ मि. मी. एकूण ३४८ मि. मी. तर नीरा देवघर धरण परिसरात आज ७४ व काल १६२ मि. मी. एकूण ८२२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे, मात्र धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी हा पाऊस आणखी काही दिवस अखंडित सुरु राहण्याची आवश्यकता आहे.