एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते.मी विचारले,”किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला.” लोहारदादा म्हणाले,”हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे.”
मी विचारले,”असे का?” तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले”,घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणखरपणे उभे असतात.”लोहार दादाचे अनुभवाचे बोल ऐकून मी विचार करायला लागलो.
खरंच जीवनात घाव घालणारी वृत्ती जास्त फोफावत आहे.चांगल्या कार्य करणाऱ्या प्रवृत्तीवर घाव घालणे.त्यातून त्यांना असूरी आनंद मिळतो.घणघण असा आवाज येताच त्याचा डंका वाजला जातो.घाव घालणाऱ्याचा आवाज मोठा असतो.पण त्याला कळतं नाही की,आपण आतून तुटत चाललोय.आवाज करणारे,अडचणी निर्माण करणारे,अडथळ्याची उभारणी करणारे हे घाव घालत असताना तुटतात.
ऐरणीच्या देवा तुला घावच बसणार.घाव घालणारे तुझी भाऊबंदकी.ऐरणीची मेहनत,जडणघडण,तप,समर्पण घाव घालणाऱ्या हातोडीला सहन होत नाही.घाव घालणारी हातोडी छिनछिन झाली.तरी आपले काम नेटाने करीत असते.त्यावेळी इकडे ऐरणी अनेक प्रकारच्या वृत्तीच्या हातोडीरुपी घावाने(अनुभव)घडते असते.खरं तर ऐरणीच्या उत्कर्षात हातोडीचे घावच श्रेष्ठ ठरतात.
चला तर प्रत्येक दिनी आपण शांत संयमी स्थिर राहून ऐरणीरुपी जीवन घडविण्याचे हातोडीरुपी घाव सोसून अनेक कलाकृती घडविण्याचे महान कार्य करु या.घाव घालणाऱ्या हातोड्या तुटल्यास पुन्हा ईश्वर रुपी लोहारदादा अनेक ऐरणी तयार करुन हातोड्या घडवणारच.
घाव सोसणे जमले की जीवन घडले
आपलाच घाव सोशिक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१