गुड थॉट्स : सुप्रभात….आज २२ फेब्रुवारी… स्मितहास्य हाच खरा अलंकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खरंच आजची गरज आहे.भाग्य व हस्तरेषा बघण्यापरीस हास्यरेषा पहावी. स्मितहास्य करणे किंवा चेहर्‍यावर सदोदित स्मितहास्य फुलवणे फार कमी लोकांना जमतं.जो प्रत्येकाच्या चेहर्‍यावर स्मितहास्याच्या रेषा रेखाटू शकतो, असा एक कलाकार असायला हवा असे वाटते.

बाळाला सुद्धा स्मितहास्य कळतं .आईच्या चेहर्‍यावरील इतर भाव व स्मितहास्यातील फरक त्याला समजतो. मग आपण तर समंजस , वयाने व कर्तव्याने मोठे आहोत बाळापेक्षा, मग आपल्याला का नाही जमणार? याचा विचार करायला हवा. त्या निरागस छोट्याशा जीवाचे गोड हसणे बघून ती माऊलीपण तिला होत असलेले त्रास , दुखणे व थकवा विसरून कामाला लागते.

आपण सहज रस्त्याने चालता चालता जरी समोर आलेल्या व्यक्तीला बघून हलकेसे स्मितहास्य जरी केले तरी समोरील व्यक्ती सुखावून जाते. ती व्यक्ती थोड्या काळाकरिता का होईना स्वतःतील दुःख विसरून आनंदी बनते.

दवाखान्यात सुद्धा वैद्य व परिचारिका यांचे चेहर्‍यावर स्मितहास्य असल्यास रुग्ण निमा बरा.आपल्या घरी परिस्थितीने अनेक जण सेवा देण्यासाठी येतात.आपण मालक म्हणून रुबाब न दाखवता स्मितहास्य दिल्यास कार्य पार पडले म्हणून समजावे. कार्यालयात सुद्धा सर्वांच्या चेहर्‍यावर स्मितहास्याची एक जरी रेषा आली ना शिपायां पासून अधिकारी खूश होतील. ज्ञानमंदिरात सुद्धा हास्य गरजेचे आहे. गुरुजनांने हसतमुखाने विद्यार्थ्यांना शिकवले तर त्यांचे अध्ययन होणारच.हास्यमय गुरुजन लेकरांच्या ह्दय कुपीत जाऊन विराजमान होतात.

हास्य हा अलंकार मुखाची शोभा वाढवतोय अन् पुढच्याचे जगण्याचे बळ वाढवतो.

आपलाच स्मित प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!