विधी साक्षरता शिबिरास साताऱ्यात चांगला प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । सातारा । ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध भरपाई योजना तसेच माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह या दृष्टीने केलेला कायदा , मृत्युपत्र , इच्छापत्र यासंदर्भातील ज्येष्ठ विधीज्ञांचे मार्गदर्शनाचा वीधी साक्षरता शिबीराचा कार्यक्रम सातारा येथील ज्येष्ठ नागरिक संघ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. त्यास ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.जे. धोटे व सचिव वरिष्ठ न्यायालय दिवाणी न्यायाधीश तृप्ती नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे विधी सेवा साक्षरता शिबिर आयोजित केले होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून पॅनल विधिज्ञ एडवोकेट सुधीर गोवेकर तसेच एडवोकेट शरद शिंदे हे उपस्थित होते त्याचबरोबर वरिष्ठ दिवाणी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत कांबिरे हे सुद्धा उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव होत्या. एडवोकेट सुधीर गोवेकर यांनी अतिशय ओघवत्या शैलीत मृत्युपत्राच्या संदर्भात माहिती दिली तर एडवोकेट शरद शिंदे यांनी विविध भरपाई योजनांची माहिती दिली. मार्गदर्शनपर भाषणे झाल्यानंतर प्रश्र्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. चंद्रकांत कांबिरे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार मदनलाल देवी यांनी सूत्रसंचालन करून प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी व सहकार्यवाह अशोक कानेटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार मदनलाल देवी आणि समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यवाह विजय मांडके यांनी आभार मानले. यावेळी स्मृतीशेष गानसम्राज्ञी लता मंगेशकर व प्रतिसरकारच्या तुफानी सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्यसैनिक राम लाड यांना आदरांजली वाहण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!