घरे, बंगले, फ्लॅट्स, रो – हौसेस, दुकान गाळे, ऑफिसेस दर्जेदार बांधकांमासाठी प्रशिक्षीत कर्मचारी ही संकल्पना प्रेरणादायी : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२२ । फलटण । शहरातील वाढत्या लोकवस्तीला दर्जेदार घरे, बंगले, फ्लॅट्स, रो – हौसेस, व्यापार संकुलातील दुकान गाळे, ऑफिसेस उपलब्ध करुन देताना त्याचा दर्जा सांभाळण्याची संकल्पना कर्मचारी प्रशिक्षण केंद्राद्वारे पूर्णत्वास जाईल असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरच्या शहरालगत ठाकुरकी येथे उभारण्यात आलेल्या प्रशस्त कार्यालय व बहुउद्देशीय इमारतीचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी आ. दिपकराव चव्हाण, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशन महाराष्ट्रचे चेअरमन रणधीर भोईटे, सचिव दिलीप शिंदे, खजिनदार किरण दंडीले, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष रणजित मोरे, बीएआय महाराष्ट्रचे माजी चेअरमन प्रताप साळुंखे व सुधीर घार्गे, फलटण सेंटरचे संस्थापक चेअरमन प्रमोद निंबाळकर, लायन्स द्वितीय प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, विक्रम झांजूरणे, बिल्डर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद जगताप, रामदास जगताप व सौ. जगताप, सातारा, वाई, कराड, शिरवळ सेंटरचे पदाधिकारी, फलटण सेंटरचे विद्यमान चेअरमन शफीक मोदी व त्यांचे सहकारी पदाधिकारी, सभासद, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापुसाहेब मोदी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश दोशी, सचिन रणवरे यांच्यासह शहर व परिसरातील व्यापारी, उद्योजक, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरचे सर्व पदाधिकारी उद्यमशील, असून आकर्षक व दर्जेदार घरे, अपार्टमेंट्स, बंगलोज उभारण्यात निष्णात असल्याने त्यांच्या गृह व व्यापारी प्रकल्पांना ग्राहकांची प्रथम पसंती असते, ही फलटण करांसाठी भूषणावह बाब असून त्याचे जतन करा असे आवाहन करीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थेच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या.

आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी सर्वश्री रणजित मोरे, प्रताप साळुंखे, सुधीर घार्गे यांनी फलटण सेंटरचे काम नियम, निकष सांभाळून, उत्कृष्ट व दर्जेदार गृह प्रकल्प उभारणीमुळे ग्राहकांच्या समाधानात भर घालणारे असल्याबद्दल समाधान व्यक्त केले तर वरिष्ठ पदाधिकारी यांनी दर्जेदार बांधकाम आणि संघटनात्मक कामात राज्यातील २८ सेंटरमध्ये फलटण सेंटर ५ व्या स्थानावर असल्याचे नमूद करीत शुभेच्छा दिल्या.

सुमारे ५० – ५५ लाख रुपये खर्च करुन उभारलेले फलटण सेंटरचे प्रशिक्षण केंद्र व बहुउद्देशीय इमारत पूर्ण झाल्याने या स्वप्न पूर्तीच्या आनंद सोहळ्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे आणि बिल्डर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रोत्साहन देणारे असल्याचे नमूद करीत बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण, वैद्यकीय शिबीरे, तांत्रिक सल्ला, कर आकारणी, कामगार कायदे, कायदेशीर समस्यांची कार्यशाळा येथे आयोजित करुन सदस्य व इतरांना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम राबविण्याचा मनोदय महाराष्ट्र सेंटरचे विद्यमान चेअरमन रणधीर भोईटे यांनी व्यक्त केला.
प्रमोद निंबाळकर यांनी प्रशिक्षण केंद्र व बहुउद्देशीय इमारत उभारणी कामी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी दिलेले योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत सर्वांची साथ व संघटनेतील एक वाक्यतेमुळे हे शक्य झाल्याचे स्पष्ट केले. फलटण सेंटरचे विद्यमान चेअरमन शफीक मोदी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केल्यानंतर फलटण सेंटरच्या कामकाजाचा आढावा सादर केला महेश साळुंखे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले तर मनुभाई पटेल व महेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!