माण बाजार समितीत शेतकर्‍यांच्या मालाला चांगला दर


स्थैर्य, सातारा, दि. 12 सप्टेंबर : माण तालुका आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या महिन्यापासून भाजीपाला तसेच फळे खरेदी-विक्री चालू केली आहे. या मार्केटमध्ये शेतकर्‍यांच्या मालाला चांगला दर देऊन जागेवरच पैसे दिले जात असल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतमालाला उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. माण-खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी या मार्केटचा लाभ घ्यावा, असे आवाहनही माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांनी केले आहे.

विलासराव देशमुख म्हणाले, माणतालुक्यात फळे व भाजीपाला मार्केट नसल्याने उत्पादक शेतकर्‍यांना फलटण, बारामती आदी ठिकाणी आपला शेतमाल विक्रीसाठी न्यावा लागत होता. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता. शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत माण बाजार समितीत भाजीपाला व फळांचे मार्केट सुरू केल्याने शेतकर्‍यांच्या वेळ व पैसा वाचला आहे. या ठिकाणीबाजारभावप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर शेतमालाची विक्री व खरेदी केली जात आहे. या आठवड्यात विविध भाजीपाल्याला उच्चांकी दर मिळाले आहेत.
नवीन बाजारपेठ सुरू झाल्याने व्यापारी, छोटेमोठे व्यावसायिक माल खरेदीसाठी येत असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी या मार्केटला आपला माल आणून कष्टातून पिकविलेल्या मालाचे चांगले पैसे करून घ्यावेत, असे आवाहनही माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख व उपसभापती वैशाली वीरकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!