दैनिक स्थैर्य | मुंबई | भारतातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने एक नवीन प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे रिचार्ज योजना पूर्वीपेक्षा स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सध्या, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक रिचार्ज योजनांमध्ये इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस यांचा समावेश असतो. मात्र, अनेक वापरकर्त्यांना फक्त व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसचीच गरज असते. त्यांना इंटरनेट डेटाचा वापर क्वचितच होतो. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना अनावश्यक सुविधांसाठीही पैसे मोजावे लागतात.
३ जुलैला खाजगी नेटवर्क कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्समध्ये दरवाढ केल्यामुळे ग्राहकवर्ग प्रचंड नाराज आहे. अशात सीमकार्ड पोर्ट करणे आणि दुसरे नेटवर्क वापरणे हाच पर्याय उरतो. अन्यथा जास्त दरांच्या रिचार्ज प्लॅन्ससोबतच मोबाईल चालवणे हा पर्याय उरतो. पण आता ट्रायच्या या प्रस्तावामुळे मोबाईल वापरकर्ते सुखावणार आहेत.
नवीन प्रस्तावांतर्गत, टेलिकॉम कंपन्यांना फक्त व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसच्या योजना सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याचा अर्थ, वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार योजना निवडण्याची मुभा मिळेल आणि त्यांना अनावश्यक खर्च टाळता येईल.
सध्या, टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज योजनांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. जियो, एअरटेल, वोडाफोन-आयडिया यांसारख्या कंपन्यांनी अलीकडेच त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे सामान्य जनतेवर आर्थिक भार वाढला आहे. ट्रायचा हा प्रस्ताव रिचार्ज योजनांच्या किंमती नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.
मोबाईलधारकांचा फायदा काय?
या नवीन प्रस्तावामुळे वापरकर्त्यांना अनावश्यक सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार योजना निवडण्याची मुभा मिळेल. टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल, ज्यामुळे किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. ट्रायने या प्रस्तावावर आपल्या भागधारकांचे मत मागवले आहे. हा प्रस्ताव अंतिम स्वरूपात मंजूर झाल्यास, मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळेल.