दैनिक स्थैर्य | दि. १ जानेवारी २०२५ | नवी दिल्ली |
नव्या वर्षाचा सूर्य व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणार्यांना खूशखबर घेऊन आला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आज म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर १४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी १ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात अद्याप कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
ऑईल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला गॅस सिलिंडरचे दर नव्याने ठरवतात. यावेळीदेखील १ जानेवारी रोजी सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडर १८०४ रुपयांना, मुंबईत १७५६ रुपये, चेन्नईमध्ये १९६६ रुपये तर कोलकाता शहरात १९११ रुपयांना मिळेल. याआधी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर दिल्लीमध्ये १८१८.५० रुपये होता. दिल्लीमध्ये आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये तर चेन्नईत ८१८.५० रुपये आहे.