केशरी कार्डधारकांसाठी गुड न्यूज; दिवाळीत मिळणार स्वस्तात गहू, तांदूळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,सातारा, दि ७: पुरवठा विभागाचे थकलेले अनुदान उपलब्ध झाल्याने त्यातून दिवाळीसाठी केशरी कार्डधारकांना स्वस्तात गहू व तांदूळ मिळणार आहे. त्यासाठी धान्य कोटा उचलण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सुरू केली आहे. दिवाळीपर्यंत हे धान्य उपलब्ध होईल. 

अनुदानाची कमतरता असल्याने स्वस्तातील धान्य उपलब्ध होऊ शकत नव्हते. तर नोव्हेंबरपासून रेशनवरील सर्व प्रकारचे धान्य बंद करण्याची तयारी शासनाने केलेली आहे. केवळ पंतप्रधान योजना व अंत्योदयच्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळणार आहे. आता तर आयुक्तांनी रेशनकार्डची तपासणीची मोहीमच हाती घेण्याची सूचना पुरवठा विभागाला केल्याने केशरी कार्डवर असलेल्या श्रीमंतांची नावे आपोआप कमी होऊन खऱ्या लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होऊ शकणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात रेशनवरील धान्याचा सर्वच लाभार्थ्यांना लाभ झाला. पण, कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात झालेल्या खर्चामुळे शासनाकडे पुरेसे अनुदान नसल्याने धान्य वेळेत उपलब्ध होण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. तरीही दिवाळी सणाच्या काळात नागरिकांची नाराजी होऊ नये, यासाठी रेशनवर धान्य उपलब्ध करण्यासाठी अनुदानही उपलब्ध करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार पुरवठा विभागाला साडेसात कोटींचे अनुदान उपलब्ध झाले आहे. या अनुदानातून दिवाळीपर्यंत कोणतेच धान्य न मिळणाऱ्या केशरी कार्डधारकांना स्वस्तात धान्य उपलब्ध केले जाणार आहे. यामध्ये आठ रुपये किलो दराने गहू व 12 रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठीचा धान्य कोटा पुरवठा विभागाने उचलण्यास सुरवात केली आहे. 

दिवाळीदरम्यान हे धान्य रेशन दुकानाच्या माध्यमातून केशरी कार्डधारकांना उपलब्ध होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दिवाळीसाठी डाळींची उपलब्धता झालेली आहे. ही डाळ पंतप्रधान योजना व अंत्योदयच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. पुरवठा विभागाने केशरी कार्डधारकांना दिवाळी सणाच्या काळातच स्वस्तात धान्य मिळण्यासाठी उपाययोजना केल्याने अशा लाभार्थ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे. 

साखर केवळ अंत्योदयसाठीच… 

दिवाळीच्या सणासाठी रेशनवरील साखरेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मात्र, यावेळेस साखर उपलब्ध होणार नसल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे. केवळ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकिलो 20 रुपये दराने एक किलो साखर उपलब्ध केली जाणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!