गुड थॉट्स : सुप्रभात…..आज ११ फेब्रुवारी… पैश्याच्या श्रीमंती पेक्षा माणुसकीची श्रीमंती श्रेष्ठ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. आजकाल भपकेपणा,मिरवणे,प्रतिष्ठा ,मानसन्मान,मीपणा,बेताल वर्तन,मोठेपणाचे प्रदर्शन यामुळे ख-या श्रीमंतीला माणसं मुकली अन् चुकीच्या जागी जाऊन बसली.
खरी श्रीमंती दाखविण्याची बाब नसून कृतीचे भंडार आहे.गरजूला मदत,निराधार व खचलेला त्याला मानसिक आधार,दारातला आलेला अनाहूत याचक अथवा प्राणीमात्र यांना विन्मुख न लावता घासातला घास,तांबभार पाणी,आपुलकीचे दोन शब्द आपणांकडून भेटल्यास आपणच श्रीमंत .

फुकाचा आव,श्रीमंती देखावा,दानाला मुकला,पै पै जुळवण्यातच आयुष्याची सांगता,नुसता धन संचय याने श्रीमंती टिकत नाही.नुसत्या झुळकीने सारे मातीमोल होते.

कायम टिकणारी गोष्ट मनमोकळा स्वभाव व माणुसकी यामुळे श्रीमंती टिकवता येते.पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाच्या चांगुलपणामुळे असंख्य जोडलेली नाती ही कधीच न संपणारी श्रीमंती आपणाला लाभावी.शब्दांतील गोडवा,माणुसकीचा झरा यामुळे जनमाणसांत आपले श्रीमंतीचे स्थान अढळ राहणार. स्वभाव व माणुसकीने येणारी श्रीमंती जगात कोणीच चोरत नाही.

चला तर श्रीमंत बनण्यासाठी माणुसकीच्या बँकेत मनमोकळ्या स्वभावाचे खाते सुरु करुन सेवारुपी ठेवीला सुरुवात केल्यास पुण्याईची जमापुंजीतून मिळणारे व्याज जगण्यासाठी पुरेसे.मुद्दल भावी पिढीच्या ताब्यात विना जामीनदार. झालो ना बघता बघता श्रीमंत.

माणुसकीची श्रीमंती चोरता येत नाही. पण वाटता मात्र येते.

आपलाच शब्दधनिक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१

 


Back to top button
Don`t copy text!