दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
वाचनाने मनावर संस्कार होऊन सकारात्मक विचार निर्माण होतात. सकारात्मक विचार माणसाला यशस्वी जीवनाकडे घेऊन जातात तर यशस्वी जीवन जगणे ही कला आहे. ही कला प्रत्येकाला अवगत होते असे नाही, त्यामुळे वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. चांगली पुस्तके मुलांना वाचायला दिली पाहिजेत. चांगली पुस्तके मस्तक घडवतात व माणसाला माणूसपण देवून माणुसकी शिकवतात. यासाठी बालवयापासून चांगली पुस्तके हातात देवून वाचनाचे धडे दिले पाहिजेत. चांगली पुस्तके ताठ मानेने जगायला शिकवतात असे मत ज्येष्ठ कवी प्रकाश सकुंडे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन, राष्ट्रीय विद्यार्थी दिन, हात धुवा दिन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे होते. तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक प्रदीप माने, सौ. गौरी जगदाळे, अंकुश सोळंकी उपस्थित होते.
प्रकाश सकुंडे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात ग्रंथ प्रदर्शन भरवून विविध प्रकारची पुस्तके, ग्रंथ विद्यार्थ्यांना हाताळायला व वाचायला मिळतात, ही बाब कौतुकास्पद आहे. शाळा हे संस्काराचे व माणूस घडण्याचे प्रमुख साधन आहे. त्यातील ग्रंथालये विद्यार्थी व शिक्षकांचा श्वास बनला पाहिजे. ‘श्यामची आई’ यासारख्या पुस्तकांनी माणसे घडवली, त्यामुळे अशा पुस्तकांची पारायणे केली पाहिजेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे म्हणाले की, माणूस हा मोबाईल व टीव्ही यात फार गुंतत चालला आहे, त्याचा किती वापर करावा हे कळले नाही तर जीवन जीवनाची जगण्याची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. पुस्तके माणसाला माणसात आणतात व सुसंवाद निर्माण होऊन समविचारी माणसांची साखळी निर्माण होते. यातून राष्ट्र उभारणीस फार मोठी मदत होते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. त्यांनी टीव्ही/मोबाईल विसरा ही कविता सादर करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी तनाया जगताप या विद्यार्थिनीने ओघवत्या भाषेत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रकाश सकुंडे कार्यक्रमाचे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत सौ. अर्चना सोनवलकर यांनी केले.सूत्रसंचालन सौ. पौर्णिमा जगताप यांनी केले तर आभार सौ. शीतल बनकर यांनी मानले.
यावेळी गजानन धर्माधिकारी, राजेंद्र घाडगे तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.