“हौद से गई, वो बूँद से नही आती”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १२ : नाव वाचून विचित्र वाटले ना? पण हे महाविकास आघाडी सरकारच विचित्र आहे. खरं तर ‘बूँद से गई, वो हौद से नही आती’ असे म्हटले जाते. पण महाविकास आघाडी सरकारच्या उलट्या कारभारामुळे सगळचं उलटे होत आहे. ‘एमपीएससी’च्या परीक्षेचा घोळ हा त्याचाच एक जिवंत नमुना. तुम्ही पुन्हा तारखा द्याल, पण विद्यार्थ्यांच्या मनोबलाचे काय? कारण तब्बल एक वर्ष झाले हा सगळा घोळ सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आणखीन किती दिवस हे सगळं सहन करायचे? बाकी तुमच्या बैठका, अधिवेशने, ‘वशाटोत्सव’चं नियोजन हे सगळं सुरूच आहे. तुम्ही मागच्या दाराने विधिमंडळात गेलात तसे सगळ्यांनाच जाता येत नाही. भविष्यातील राज्यसेवेतील अधिकारी होऊ घातलेत हे विद्यार्थी. त्यांच्याच साथीने भविष्यात राज्य चालणार आहे. जे अभ्यास करत आहेत त्यांना तरी न्याय मिळू दे. बाकी लॉटरी म्हणजे काय त्याचा अनुभव अख्खं सरकार घेतच आहे. तुम्हांला एक घरात बसलेले चालते, पण बाकीच्यांची चूल घराबाहेर पडल्यावरच पेटते. मग त्यांना घरी बसून कसे चालेल?

या सगळ्याची सुरुवात कुठून झाली याचा आढावा घेऊया. अर्थात हे सगळं प्रसिद्ध झालेल्या नोटिफिकेशन्सच्या आधाराने मांडतोय. सर्वप्रथम 23 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारने ‘एमपीएससी 2020’ ची पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्याचे निश्चित केले. दुर्दैवाने ‘कोरोना’ची साथ आली त्यामुळे 22 मार्च 2020 रोजी पत्रक काढून परीक्षा 26 एप्रिल 2020 रोजी घेण्याचे निश्चित केले. पण “कोरोना’चा प्रसार वाढत असल्याने 7 एप्रिल 2020 रोजी पुन्हा एक पत्रक काढून त्यानुसार ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. इथपर्यंत हे सगळं ठीक होते. कारण कोरोनाचं नेमकं काय होणार हे त्यावेळी कोणालाही माहीत नव्हते. सगळी मजा इथून पुढं केलीये.

 

  1. दिनांक 17 जून 2020 रोजी पुन्हा एक प्रसिद्धीपत्रक आले. त्यात असे सांगितले की 13 सप्टेंबर 2020 रोजी परीक्षा होईल.

 

  1. परीक्षेला एक महिना शिल्लक असताना 12 ऑगस्ट 2020 रोजी सांगितले की NEET परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी होत असल्याने पूर्व परीक्षा 13 ऐवजी 20 सप्टेंबर 2020 रोजी परीक्षा होईल.

 

  1. पुन्हा 7 सप्टेंबर 2020 रोजी एका पत्रकाद्वारे परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी होईल असे सांगितले. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे सुद्धा नमूद केले.

 

  1. 10 ऑक्टोबर 2020 रोजी म्हणजे परिक्षेला एक दिवस बाकी असताना पुन्हा एक सरप्राईज देऊन सांगितले की, परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार नाही. नवीन तारीख यथावकाश जाहीर केली जाईल. यामध्ये राज्य शासनाने व सामान्य प्रशासन विभागाने आदेश दिल्याचे नमुद केले.

 

  1. दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी पुन्हा नवीन तारीख आली. 14 मार्च 2021 रोजी परीक्षा होईल असे सांगण्यात आले.

 

  1. 2 मार्च 2021 रोजी पत्रक काढून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट बाबत सूचना देण्यात आल्या.

 

  1. 10 मार्च 2021 रोजी परीक्षार्थींसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. याचा अर्थ परीक्षा 14 मार्च रोजीच होणार यावर शिक्कामोर्तब झाले शिवाय सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

  1. आता कहानी मध्ये ट्विस्ट आला. 11 मार्च 2021 रोजी पुन्हा एकदा परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकत असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले. 11 ऑक्टोबर 2020 च्या पत्रकात देखील हेच सांगण्यात आले होते.

गंमत बघा की, जे लोक एक दिवस आधी उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करतात त्यांना एका रात्रीत कोरोना विषाणू वाढत असल्याचा साक्षात्कार व्हावा? विशेष म्हणजे ही सूचना कधी सामान्य प्रशासन विभाग देतो तर कधी आपत्ती व्यवस्थापन विभाग. म्हणजे सगळेच गौडबंगाल आहे. सामान्य प्रशासन विभाग हा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अखत्यारीत येतो. आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अखत्यारीत येतो. हे दोन्ही विभाग आता एकमेकांकडे ढकला-ढकली करणार. यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की राज्य सरकारकडून येणारे नवनवीन पत्रके रोज वाचत बसायचे? असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. जवळपास प्रत्येक प्रसिद्धी पत्रकात कोरोना विषाणूचा उल्लेख आहे. मग तयारी करायला वेळ किंवा मनुष्यबळ मिळाले नाही हा मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्ह मधील मुद्दा अत्यंत हास्यास्पद नाही का?

हा सगळा घटनाक्रम बघितला तर लक्षात येईल की हे सरकार अक्षरशः पोत्याने चुका करत आहे. धोरणामध्ये प्रचंड धरसोड वृत्ती आहे. आत्तापर्यंत हे लोक ‘आलं अंगावर, ढकल केंद्रावर’ या वृत्तीने वागत होते. मात्र आता आपापसांतील विभागांवर देखील ढकलत आहेत. तुम्ही वंशपरंपरागत मिळालेल्या पक्षाचं काहीही करा, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळू नका. तुम्ही लाख राजकीय घोडचूका करा, पण विद्यार्थ्यांना असे वेठीला धरू नका. तारीख जाहीर करू, उद्याच करू, एका आठवड्यातच परीक्षा घेऊ वगैरे सांगण्यासाठी केवळ फेसबुक लाइव्ह करणे हे केवळ ‘बूँद-बूँद’ प्रयत्न आहेत. परीक्षा सांगितलेल्या वेळेला घेण्यासाठी ठोस काम केले असते तर हे सगळं करण्याची नामुष्कीच आली नसती. एवढे आभाळ फाडून ठेवल्यानंतर हातात सुई दोरा घेऊन आल्याचे कौतुक काय सांगता? हौद वाहून गेला आणि त्यात थेंब टाकून विद्यार्थ्यांना चुना लावू नका. ‘हौद से गई, वो बूँद से नही आती’ एवढेही साधे कळत नसेल तर आपण आपली कार्यक्षमता किती रसातळाला नेली आहे याचा विचार केलेला बरा. कारण आपली कृती तर शून्यच असते.


Back to top button
Don`t copy text!