
स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सातारा- लातूरमहामार्गावरील गोंदवले खुर्द हद्दीत अपघातांची मालिका थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत केलेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी प्रशासनाने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीच कार्यवाही ना झाल्याने गोंदवले खुर्द ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून, रस्ता अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोंदवले खुर्द (ता. माण) येथील मुख्य चौकातील एसटी बस थांबा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे, तर बरेच जण जायबंदीही झाले आहेत. सातारा व सोलापूर जिल्ह्यांला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, वाहनांच्या वेगाला मर्यादा नसल्यानेच हे क्षेत्र अपघातप्रवण बनले आहे.
या परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार संबंधितांनी गतिरोधक व सूचना फलकाची उभारणी करणे आवश्यक होते; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु या इशार्याकडेही दुर्लक्ष केल्यानेग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.
त्यामुळे ग्रामस्थांनी गेल्या 15 दिवसांपूर्वी या महामार्गावर ठिय्या मांडून रस्ता रोखून धरला. आंदोलन सुरू होताच. म्हसवडकडे निघालेले पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधितांनी पाच दिवसांत या महामार्गावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित केले होते; परंतु प्रशासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने कोणत्याही क्षणी ठिय्या मांडून हा महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दीपक पोळ, शंकर जाधव व ग्रामस्थांनी दिला आहे.
