श्री सेवागिरी महाराजांचा पुसेगावात गुरुवारी रथोत्सव


स्थैर्य, सातारा, दि. 14 डिसेंबर : देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रेस श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व मानाच्या झेंडा मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. गुरुवारी (ता. 18) मुख्य रथोत्सव सोहळा पार पडणार आहे.

रविवारी सकाळी 8.30 वाजता श्री सेवागिरी महाराज मंदिरात मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर, भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मानाचा झेंडा व पालखीचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणातून सवाद्य झेंडा व पालखीच्या मिरवणुकीचे यात्रास्थळाकडे उत्साहात प्रस्थान झाले. ही मिरवणूक यात्रास्थळावर पोचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मानाच्या झेंड्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर यात्रेस प्रारंभ झाला.

श्री सेवागिरी यात्रेतील रथ मिरवणूक, बैलगाडी शर्यत, बैल बाजार, कुस्त्यांचा फड, कृषी प्रदर्शन, श्वान शर्यती, जनावरांचे प्रदर्शन, विविधस्पर्धा, युवा महोत्सव, तमाशातील ठसकेबाज लावण्या, मिठायांच्या दुकानातील तारेसारखी बारीक जिलेबी, चविष्ट फरसाणा, महिला व युवर्तीसाठी सौंदर्य प्रसाधनांची खरेदी, आकर्षक आणि उंच पाळणे, लहान मुलांसाठी खेळणी, विविध प्रकारचे स्टॉल, खाऊगल्लीची मेजवानी, मनोरंजनाचे खेळ हे यात्रेकरूंच्या दृष्टीने अनोखी पर्वणी ठरणार आहेत.कोट्यवर्षीची उलाढाल होऊन ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी यात्रा म्हणून श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेचा लौकिक आहे.

दहा दिवसांपेक्षा अधिक काळ भरणार्‍या श्री सेवागिरी यात्रेतील विविध कार्यक्रम सुरू झाले असल्यानेपुसेगावला चांगलीच चहलपहल वाढली आहे. यंदा यात्रा काळात नाताळाच्या सुट्या सुरू होत असल्याने श्री सेवागिरीमहाराजांच्या यात्रेस येणार्‍या भाविकांच्या संख्येत यंदा विक्रमी वाढ होईल, असा अंदाज आहे.दरम्यान, यात्रेच्या अनुषंगाने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन केले असून, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यात्रेकरूंच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!