
स्थैर्य, सातारा, दि. 10 डिसेंबर : गोंदवले (ता. माण) येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 112 वा पुण्यतिथी उत्सव सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरू माउलींच्या पुण्यस्मरणानिमित्त रात्रीपासूनच संपूर्ण गोंदवलेनगरी रामनामात मग्न झाली होती. मनात फक्त गुरू माउलींच्या समाधी दर्शनाची आस होती. ‘रघुपती राघव’च्या भजनाने भक्तिमय झालेल्या वातावरणात पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी समाधी मंदिरातील श्रीरामाचा जयघोष ओसरला अन् पुण्यकाळाच्या क्षणी लाखो भाविकांनी श्रीरामाचा जयघोष करत ब्रह्मचैतन्यांच्या समाधीवर गुलाल-फुलांची उधळण केली.
श्रींचा 112 वा पुण्यतिथी महोत्सव 5 डिसेंबरपासून कोठी पूजनाने सुरू झाला होता. या निमित्ताने समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. त्याबरोबरच मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन, भजन, गायन अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. रविवारी पहाटे श्रींच्या पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम असल्याने एक दिवस आधीपासूनच भाविक गोंदवल्यात दाखल झाले होते. त्या दिवशी पहाटे दोन वाजल्यापासून भाविकांच्या गर्दीत वाढ होत गेली आणि साडेपाचच्या सुमारास समाधी मंदिर परिसर भाविकांनी भरून गेल्याने मुख्य चौकापर्यंत सातारा, पंढरपूर रस्त्यावरही भाविकांचीच गर्दी दिसत होती. ‘श्रीं’च्या पुण्यकालानिमित्त गावातही विविध ठिकाणी रात्रभर भजन सुरू होते.
पहाटे सनई वादनानंतर ब्रह्मानंद मंडपात काकड आरती करण्यात आली. ‘श्रीं’च्या महानिर्वाणाचा तो पुण्यकाल जवळ येताच समाधी मंदिरातील ‘श्रीराम’ ‘श्रीराम’ असा जयघोष ओसरला आणि भाविकांनी गुलाल, फुलांची उधळण केली. गुलालाचा हा मुख्य कार्यक्रम होताच श्रींची आरती व श्लोक पठण करण्यात आले. त्यानंतर गुरू माउलींच्या समाधी दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी ‘श्रीं’च्या चरणी माथा टेकला. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी चोख बंदोबस्तठेवलाहोता.

