फलटणला ट्रॅव्हल गाईड म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी; युवकांनी अर्ज करण्याचे महाराष्ट्र पर्यटन संचानालयाचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२१ । फलटण । आपल्या गावचे किल्ले, डोंगर, दऱ्या, मंदिरं, एखादं ऐतिहासिक संग्रहालय किंवा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला असेल आणि जर तुम्ही ती माहिती इतरांना देखील सांगू शकत असाल तर महाराष्ट्र पर्यटन संचानालय तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलेली आहे. राज्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी ट्रॅव्हल गाईड म्हणून काम करण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन संचानालय घेऊन आलेले आहे. यामध्ये फलटणचा सुद्धा समावेश असून फलटणची ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक माहिती जर माहिती असेल तर तुम्ही नक्की त्यासाठी अर्ज करू शकता.

राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळी ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या पर्यटन स्थळामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटणचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गत काही महिन्यापूर्वी “फलटण” हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केलेली होती. त्यामधूनच राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून फलटणची माहिती जगासमोर येण्यासाठी एका खासगी वृत्तवाहिनेने फलटणची चित्रफीत तयार केलेली होती. फलटणचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होण्यासाठी आता महाराष्ट्र पर्यटन संचानालयाच्या माध्यमातून सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वालेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्राधान्याने स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सदर उपक्रमासाठी स्थानिक पर्यटन स्थळी तज्ञ प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. आपल्या फिरस्तीची आवड एका स्थिर करिअरमध्ये बदलण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे, आपणही इच्छुक असल्यास महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2021 पूर्वी अर्ज करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

टूर गाईड म्हणून कामकाज करण्यासाठीचे निकष

वय मर्यादा : 18 वर्ष पुढील

शिक्षण : वय वर्ष 40 खालील इच्छुकांसाठी किमान 12 वी उत्तीर्ण

वय वर्ष 40 वरील इच्छुकांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण


Back to top button
Don`t copy text!