स्थैर्य, सातारा, दि. 05 : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. छोट्या मोठ्या उद्योग आणि कंपन्यांचीही अर्थव्यवस्था कोलमडली असून औद्योगिक क्षेत्राला पुन्हा उभारी मिळण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांसह पुणे, मुंबईवरून आलेल्या कुशल बेरोजगारांना पुन्हा रोजगार मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्याच सहकार्यातून स्थानिक भूमिपुत्र आणि पुणे, मुंबईवरून नोकरी सोडून आलेल्यांसाठी सातारा एमआयडीसीमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, उद्योजकांना युनियन, ठेकेदारी असा कोणताही त्रास न होता आणि सातारा- जावली मतदारसंघातील बेरोजगारांनाही एजंटगिरी न होता विनाशुल्क, मोफत रोजगार मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतः हेल्पलाईन सुरु केली असून त्याद्वारे गरजू बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
कोरोना महामारीमुळे परप्रांतीय कामगार आणि मजूर हे त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे सातारा एमआयडीसीतील सर्व कंपन्यांमध्ये विविध विभागातील हजारो पदे रिक्त झाली आहेत. उद्योजक कंपन्या, उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत परंतु औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये इंजिनियर, अकॉउंटन्ट, फिटर, वेल्डर, हेल्पर यासह सर्वच पदाच्या कामगार-कर्मचारी यांची कमतरता भासू लागली आहे. ही समस्या सोडवण्यासंदर्भात एमआयडीसीतील मास संस्थेने जिल्हाधिकारी, विविध मंत्री, खासदार, आमदार, विविध टेक्निकल संस्था, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. याची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्वरीत दखल घेतली. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली मासची बैठक झाली. यावेळी मासचे अध्यक्ष सुरींदर अंबरदार, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, माजी अध्यक्ष राजेश कोरपे, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ, नानासाहेब देशमुख, नितिन माने, शैलेश बिडवाई, जितेंद्र जाधव, दीपक पाटील, पराग काटदरे, केतन कोटणीस आदी संचालक व उद्योजक उपस्थित होते.
कामगार, कर्मचारी मिळण्यासाठी सातारा व जावळी तालुक्यातील सद्यस्थितीत अनेक मूळ स्थानिक भूमिपुत्र असलेले कामगार तसेच कोरोनामुळे पुणे, मुंबई येथील काम सोडून मूळ गावी परत आले आहेत पण, रोजगार नसल्याने घरीच बसून आहेत अशा गरजू बेरोजगार लोकांना मास मार्फत संस्थेच्या सदस्य कंपन्यांमध्ये, उद्योगांच्या मागणीप्रमाणे व लोकांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार देऊन उद्योजकांना मनुष्यबळ मिळण्यासाठी लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिले. तसेच उद्योजकांना मदत करताना कुठल्याही प्रकारचे मध्यस्थ नसतील व उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास अथवा अडचण येऊ देणार नाही असे सांगून सर्वाना खंबीरपणे मदत करायची भूमिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली. त्यानुसार सातारा एमआयडीसी मधील विविध कंपन्यांमध्ये आता स्थानिक भूमिपुत्र आणि पुणे, मुंबईची नोकरी सोडून आलेल्या स्थानिकांना त्यांच्या कौशल्यानुसार हक्काच्या रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
एक नया पैसा खर्च न करता मिळणार नोकरी
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निर्णयानुसार एमआयडीसीतील कंपन्यांना विविध पदावरील कामगार पुरवण्यासाठी आणि बेरोजगार, होतकरू कामगारांना त्यांच्या कौश्यल्यानुसार एक नया पैसा खर्च न करता मोफत नोकरी मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी हेल्पलाईन सुरु केली आहे. इच्छुकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील दूरध्वनी क्र. ०२१६२-२८२२३४ आणि ०२१६२- २८३२३४ यावर संपर्क साधून आपली माहिती कळवायची आहे. इच्छुक गरजू बेरोजगारांनी संपर्क साधून या संधीचे सोने करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने केले आहे.