स्थैर्य, सातारा, दि.०३: ट्रॅव्हलबसमधून सोन्या-चांदीची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजताच भुईंज पोलिसांनी आनेवाडी टोलनाक्यावर बस अडवून 29 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी राजवीर हनमंत तोमर रा. शिवाजी चौक कोल्हापूर मुळ रा. सोहनर ता. नडवाल जि. शिवपूरी (मध्यप्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूरहून पुण्याकडे जाणार्या सना ट्रॅव्हल (एमएच-09 – सी. व्ही. -3299) मधून अवैधरीत्या लाखो रुपयांच्या सोनेचांदीची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस पथकास सुचना देवून आनेवाडी टोलनाका येथील पुणे बाजुकडे जाणार्या लेनवर नाकाबंदी करण्यात आली. रात्री 3 च्या सुमारास नमूद वर्णनाची ट्रॅव्हल आली. पोलिसांनी बस थांबवून सर्व प्रवाशी व ड्रायव्हर, क्लिनर यांना बसमधून ऐवजाची अवैध वाहतूक होत असल्याचे सांगितले. त्यांनतर ट्रॅव्हल्सच्या क्लिनरला बसची डीकी उघडून चेक करतताना दोन पांढर्या पॉलिथीनच्या गोण्या मिळून आल्या. त्याबाबत चालक व क्लिनरकडे विचारपूस केली असता त्यांनी प्रवाशी राजवीर हनमंत तोमर रा. शिवाजी चौक कोल्हापूर मुळ रा. सोहनर ता. नडवाल जिल्हा शिवपूरी राज्य मध्यप्रदेश याच्या गोण्या असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे संबंधित इसमाकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. परंतु, त्याची कसून चौकशी केली असता त्याने गोण्यामध्ये सोन्या-चांदीचे दागीने (माल) असल्याचे सांगून त्याचे कब्जात असणारे सॅक बॅगमध्ये सुध्दा सोन्या-चांदीचे दागीने असल्याचे सांगितले.
या दागिन्यांबद्दल त्याचेकडे पावती बाबत विचारणा केली असता त्याने दागीन्यांचे मालकी हक्काबाबत कोणताही पुरावे नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा माल चोरीचा असल्याचा वाजवी संशय निर्माण झाल्याने त्यास मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणले. या इसमाचे ताब्यात 13 लाख 72 408 रुपयांचे 34 तोळे वजनाचे मंगळसुत्र, नेकलेस, ठुशी असे सोन्याचे दागीने, 14 लाख 31 रुपये 718 रुपयांची 55 किलो चांदीचे दागीने आणि रोख 1 लाख 58 हजार 590 असा एकूण 29 लाख 62 हजार 716 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
अधिकृत लासन्स धारक सोनार व दोन सरकारी पंच यांचेसमक्ष सी.आर.पी.सी. 102 प्रमाणे मुद्देमाल जप्त केला व सविस्तर रिपोर्ट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांना सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे पुढील कार्यवाही करीता जी. एस. टी. कार्यालय सातारा यांना रिपोर्ट सादर करणेत आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष कांबळे, उप निरीक्षक निवास मोरे, पो.उप निरीक्षक, रत्नदिप भंडारे, पोलीस कर्मचारी, विकास गंगावणे, बापूराव धायगुडे, अतुल आवळे, दुदुस्कर, गायकवाड, कदम, वर्णेकर यांनी केली आहे.