
दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । बारामती । भारत हा कृषी प्रधान देश असल्याने व सद्या रासायनिक मुक्त शेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेती व्यवसायात मोठ्या रोजगाराची संधी आहे, या संधीचे “सोने” करा, असे प्रतिपादन त्रिवेणी फूड्स अँड ऑइलच्या संस्थापिका शुभांगी चौधर यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “कृषी क्षेत्रातील अनुभवाचे बोल” या विषयावर शुभांगी चौधर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चौधर बोलत होत्या.
या वेळी कृषी महाविद्यालय इस्टेट मॅनेजर आर. डी. बनसोड, राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे उपाध्यक्ष डॉ. ए. जी. कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. व्ही. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक साबळे, डॉ. नजीर तांबोळी, डॉ. अभय पाटील, आश्लेषा शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
त्रिवेणी फूड्स व ऑइलचा व्यवसाय सुरू करताना आलेल्या विविध अडचणी, मार्केटिंग पद्धत, ग्राहकांचा विश्वास आदी विषयावर अनुभव कथन करून आणि गुणवत्ता व दर्जा बाबत कोठेही तडजोड केली नाही. त्यामुळे ग्राहक वर्ग वाढला. कृषी क्षेत्रातील नवीन व्यवसाय करताना गुणवत्ता दर्जा दिला तर ग्राहक तुम्हाला शोधत येईल, असेही चौधर यांनी सांगितले.
या वेळी कृषी महाविद्यालयाच्या वतीने शुभांगी चौधर यांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन श्रुती जंगम यांनी केले व आभार आविष्कार दाते यांनी मानले.