दैनिक स्थैर्य । दि.१२ मे २०२२ । सातारा । पुढे पोलीस बंदोबस्त लागला आहे. अंगावर एवढे सोने घालून फिरू नका, माझ्याकडे द्या, तुम्हाला मी पुडीत बांधून देतो, असे म्हणून दोघा भामट्यांनी वृद्धेला तब्बल एक लाखांना गंडा घातला. ही घटना मंगळवार, दि. १० रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या नलवडे काॅलनीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमल रामराव शिंदे (वय ७६, रा. साई काॅलनी, शाहूनगर, सातारा) या सायंकाळी काॅलनीतून चालत जात असताना दोन अनोळखी युवक तेथे आले. पुढे बिलबिले साहेबांचा बंदोबस्त लागला आहे. अंगावर एवढे सोने घालून फिरू नका, असे म्हणून त्यांच्याकडून पाच तोळ्याच्या हातातील चार बांगड्या काढून घेतल्या. त्या बांगड्या पुडीत ठेवल्या. त्यानंतर ती पुडी शिंदे यांच्या हातात देऊन दोघेही निघून गेले. काही अंतर पुढे गेल्यानंतर शिंदे यांनी पुडी उघडून पाहिली असता त्या पुडीमध्ये बेंटेक्सच्या तीन बांगड्या असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार घरातल्यांना सांगितला. घरातल्यांनी तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.