
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । ‘जसा आला, तसाच परतणार’ हे आणि एवढेच या जगीचे अंतिम सत्य आहे. किती खाचखळगे पार केले किंवा कुठलेच खाचखळगे मार्गी आडवे आलेच नाहीत अशा कुठल्याही आयुष्याची सांगता तिरडी पाशीच होत असते. मृत्यू हेच शाश्वत सत्य असल्याने पार्थिवाची विल्हेवाट लावणे कायम दुसर्या जिवंत माणसाच्या हाती असते. शरीराची केवळ विल्हेवाट लागणार का? पंचमहातत्वांनी तयार झालेले शरीर योग्य संस्कारांनी मातीत विलीन होणार, याचे भाग्यही जन्म घेताच सटवाई भाळी लिहित असावी. पाठोपाठ झालेल्या दोन विभिन्न जागीच्या स्मशान दौर्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली.
परगावी एका मयतीला जावे लागले. स्मशान म्हटले की सुतकी चेहरे ओघानीच आले. दुःखाचा आवेग सावरत प्रिय व्यक्तीचे कलेवर घेऊन येणारी वर्दळ रोजचीच असल्याने निर्ढावलेले पालिका काळजी वाहू आपापल्या खुर्च्या पकडून, तोंडांत तोबरा भरुन मोबाईलमध्ये डोके घालून केवळ अंदाजानी गुरकावत, गेल्यामुळेच आलेल्यांचे स्वागत ते करीत होते. आपला स्वजन मेला हा आपल्याकडून मोठ्ठा गुन्हा झाला असे वाटावे अशी वागणूक देण्यात कोणतीही कसर ते बाकी ठेवत नव्हते. ही लोकं कागदपत्रांचा बडगा उगारात आणि बारा पंधरामण सरपण एकेका देहा पाठी जाळत सोबतीला शब्दशः टाळू वरचे लोणी खाण्याची अनुभूती देत होते.
गुलाल बुक्क्याच्या आणि हारांच्या ओझ्याखाली तिरडीवर बांधून पडलेला आप्त धडधडणार्या शववाहिकेतून बाहेर पडण्यासाठी थरथरणार्या डोक्याने वाट पाहात असल्याचा भास होत होता. पार्थिव ठेवायला सपाट जागाच नसल्याने सतत डूगडुगणारे मृत शरीर वेडेवाकडे पडायला कंटाळून आता स्वतःच उठून चितेवर झोपेल आणि पटकन पेटवा आता, असे म्हणेल असे वाटत होते. मूळच्याच भेसूर वातावरणास सोबत करणारी गलिच्छ अस्वच्छता नाक दाबत असतानाच, असहकारी सेवकवर्ग आगीत रॉकेल ओतायचे काम तेवढे इमाने इतबारे करताना पाहून आपल्याला ह्या आयुष्यात या ठिकाणी जळायचे नाही हा एकच भाव माझ्या डोक्यात येत होता.
परगावातून गावी येऊन या दारूण अनुभवातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच गावातले एक परिचित गेल्याचे कळले. आता पुन्हा एकदा तोच अनुभव घ्यायला मन तयार होईना. तरी जाणे क्रमप्राप्त होते. सगळे सोपस्कार झाल्यावर गाडीने स्मशानात पोचलो. गाडी लावण्यासाठी शेड बघून थोडा अचंभित झालो. वाहनतळापासून चौथर्यापर्यंत साफसुथरा मातीचा रस्ता पाहून थोड्या आशा पल्लवित झाल्या. शेवटी, जाळणे हा एक कलमी कार्यक्रम असला तरी शेवटचा राम राम थोडा सुखावह झाला तर बिघडलं कुठं!
सर्व पूर्वानुमानाला छेद देणारा इथला केअर टेकर आकाश भेटला आणि जीवात जीव आला. त्या उमद्या तरुणाकडे पाहून स्मशानात अगदी जवळचा मित्र सोबतीस असल्याची भावना मनात दाटली. काही तासांच्या फरकाने अगदी विरुद्ध अनुभवाला सामोरा जात होतो. मूळच्या प्रसन्न चेहेर्यावर प्रसंगानुरूप आकाशने धारण केलेला गंभीरपणा खरं पाहाल तर भुरळ घालून गेला. करोना काळात वाढलेल्या टर्नओव्हरमुळे अंगी मुरलेल्या नैपुण्याचा पुरेपूर वापर करत चाललेला आकाशचा वावर अतिशय आश्वासक वाटत होता.
चार पावसाळे जास्त बघितल्याचा टेंभा मिरवत आणलेल्या लाकडाच्या कमतरतेवर स्मशानातच सभा भरवू पाहणार्या आगाऊ पण बिनकामाच्या सोकॉल्ड म्होरक्यांना न बोलताच त्याने त्यांची जागा दाखवून दिली. कसलेल्या चित्रकाराच्या कुंचल्यानी एकेका फटकार्या सरशी जसे छानसे चित्र घडत जाते अगदी त्याच नजाकतीने त्याने चिता रचायला सुरवात केली. शेजारी पहुडलेल्या कलेवरावर घडणार्या संस्कारावर नजर ठेवून आवश्यक त्या सूचना नातेवाईकांना देत त्यानी एक थर लावून घेतला.
मटक्यात पाणी, अश्मा म्हणून आवश्यक तेवढा अणकुचीदार दगड, अग्नी देण्यासाठी तयार करायचा टेंभा, सारे सारे त्याच्या सफाईदार हालचाली पाठी आवश्यक तेव्हा उपलब्ध होत होते. अगदी अलगद त्याने इतरांच्या सहाय्याने पार्थिव चितेवर ठेवले. ठेवणे आणि टाकणे यातला फरक प्रत्येक वर्तनात दिसत होता. अलगद डोके उचलून चंदनाची उटी मानेपर्यन्त सरकवली. खोबर्याच्या वाट्यात तुपाचे गोळे, अगरबत्ती, कापूर, सारे सारे बरोब्बर जागच्या जागी बसले. तोंडांत अंगठ्यानी पाणी पाजून होताच, अदबिनी सगळ्यांना थोडे बाजूला जायला सांगितले.
चिता रचणे ही सुद्धा एक कला आहे. हे त्याच्या कामाचा अवाका बघून पटले. कमीत कमी लाकडांचा वापर करत त्या तरुणाने जणू एक देखणे शिल्पच तयार केले. आवश्यक पद्धतीने वारा फिरवायची उपाय योजना करून त्याने मुलाला चितेवरल्या ठराविक जागी अग्नी द्यायला लावला. केवळ अर्धा लिटर रॉकेलमध्ये चिता धडाडून पेटली. धूर नाही, रॉकेलचे हबके मारायची गरज नाही. रबर, टायर असल्या ज्वलनशील लोकांना शरण जाणे नाही. अगदी पर्यावरणपूरक चिता पेटवली पठ्ठ्याने. खूप सार्या झाडांना त्याच्यामुळे जीवनदान मिळालेले पाहून धन्य वाटले.
मुलाबाळांचे सांत्वन करून सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर नजर आपसूकच त्या कलाकारास शोधत राहिली. असल्या चितेवर झोपायचे भाग्य आपल्या नशिबी येवो असे म्हणत त्या तरुणाची गाठ घेतली. तो करत असलेल्या कार्याला मनापासून दाद देण्यासाठी त्याच्या पाठीवर थाप टाकली. एकाच दिवसात आलेल्या या विभिन्न अनुभवामुळे त्याचे वेगळेपण जास्तच उठून दिसत होते. मला तुमचा सत्कार करायचा आहे कुठे भेटाल? या प्रश्नावर दिलखुलास खोचक हसत इथच अन् कुठं असं म्हणाला. ‘कधी बी, या हीतच, हाय बघा,’ या त्याच्या आमंत्रणाला येतो, म्हणायचं धाडस माझ्यात नव्हतं. सकाळी माझ्याकडे त्याला बोलावून शाल श्रीफळ आणि वडाचे रोप देऊन त्याचा सत्कार केला आणि खरंच स्मशानातले सोने गवसल्याचा साक्षात्कार झाला.
– डॉ. महेश बर्वे, फलटण