स्थैर्य, मुंबई, २६ : अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने इतर चलन धारकांसाठी सोने महाग झाले. त्यामुळे गुरुवारी, स्पॉट गोल्डच्या किंमती १७६१ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. तथापि, विषाणूच्या दुसऱ्या आणि संभाव्य लाटेमुळे सोन्याचे दर स्थिर राहिले. तसेच बाजाराच्या विश्लेषणात, साथीच्या आजारानंतर आर्थिक सुधारणांचा काळ आधीच्या अंदाजापेक्षा खूप मोठा असू शकतो, असे दर्शवले. त्यामुळेही सोन्याचे भाव स्थिर राहिले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
स्पॉट सिल्व्हरचे दर २.०५ टक्क्यांनी घसरून १७.९ डॉलर प्रति औसांवर आले. एमसीएक्सवरील दर ०.६९ टक्क्यांनी वाढले. ते ४८११६ रुपये प्रति किलोवर बंद झाले.
जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील आर्थिक कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कच्च्या तेलाचे दर १.८७ टक्क्यानी वाढून ३८.७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अनेक आशियाई, युरोपियन आणि अमेरिकी देशांनी त्यांच्या नागरिकांवर कामावर जाण्याची परवानगी दिल्याने बेरोजगारीचा उच्चांकी दर काही कमी झाला.
मागणी कमी झाल्याने ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंपनीने उत्पादनात तीव्र कपात केल्यानेही तेलाच्या किंमती वाढल्या. या महत्त्वाच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. तथापि, अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, यूएस क्रूड इन्व्हेंटरीची पातळी १९ जून २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात १.४ दशलक्ष बॅरलनी वाढली. अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीची पातळी वाढल्याने जागतिक मागणी कमी झाल्याचे संकेत मिळतात. याचा परिणाम बाजारातील भावनांवर झाला.