वीज वितरण कंपनीच्या कारभारावर गोखळी ग्रामस्थ नाराज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, गोखळी दि.०६ : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

जाधववाडी (तामखडा) विद्युत सबस्टेशन येथून गोखळी आणि पंचक्रोशीत वीज पुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यापासून या परिसरात रात्री – अपरात्री खंडित झालेला वीज पुरवठा रात्र रात्र बंदच राहत आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली असता, झाडे झुडपाच्या फांद्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण देऊन ते मोकळे होतात. वास्तविक वीज प्रवाहाला अडथळा ठरणारी झाडे, फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणे गरजेचे असताना या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे.

पूर्व भागातील गोखळी, पवारवाडी, आसू, साठे येथे कोरोना बाधीत रुग्णांनासाठी कोरोना विलिनीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्याने या ठिकाणच्या रुग्णांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. यातून कोरोना बाधीत रुग्ण आजारातून बाहेर पडण्याऐवजी जास्त आजारी होण्याचा धोका संभवतो.

दरम्यान, या गलथान कारभारास जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी; अन्यथा संबंधितांच्या विरोधात आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील यांनी दिला आहे.

गतवर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये थकीत वीज बीले ग्राहकांनी १०० टक्के भरली आहेत.
गोखळी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाणी टंचाईला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. गोखळी पाणी पुरवठा योजना गुणवरे हद्दीतून कॅनोल शेजारी विहीर खोदकाम करून विद्युत पंप बसवून राबविण्यात आली. सदर वीज कनेक्शन सिंगल फेज नसल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो. सिंगल फेज कनेक्शन डीपी बसविण्यात न आल्याने दोन वर्षा पासून काम रखडलेले आहे. संबंधित वरीष्ठ अधिकार्यानी यामध्ये लक्ष घालून यापुढे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिंगल फेज डिपी त्वरित बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!