
स्थैर्य, फलटण, दि. ०५ सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आलेल्या रस्ता सुधारणेच्या कामामुळे फलटण तालुक्यातील गोखळी पाटी ते गोखळी गावठाण हा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ११ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हा रस्ता दिनांक ०८ सप्टेंबर २०२५ ते ०७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.
रस्त्याच्या ०/०० ते १/५०० किलोमीटर लांबीच्या टप्प्यात सुधारणेचे काम केले जाणार असल्यामुळे वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. प्रवाशांनी गोखळी पाटी येथून राजाळे व पुढे निरा-वाघज मार्गे बारामती या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी या कालावधीत बंद असलेल्या रस्त्याचा वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.