स्थैर्य, फलटण, दि. १४ : गोखळी, ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत यांचे सुपुत्र रुपेश भागवत यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असून पोलीस प्रशिक्षण पूर्ण करुन ते बृहन्मुंबई पोलीस दलाच्या सेवेत रुजू होत असल्याबद्दल त्यांचा फलटण येथे यथोचित सत्कार करण्यात आला.
पाक्षिक महामित्र व जय ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्थांच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात पोलीस निरीक्षक रुपेश भागवत यांच्या समवेत त्यांचे पिताश्री सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत, बंधू पोलीस कॉन्स्टेबल निलेश भागवत, छोटी सायकल पटू स्वरा भागवत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजेंद्र भागवत व सौ. भागवत यांनी प्रपंचाचा गाडा हाकताना मुलांना उच्च शिक्षीत तर केलेच परंतू त्यांच्यावर उत्तम संस्कार केल्याने ती समाजात आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होत आहेत, सेवाभावी वृत्तीने, समाज संघटीत कसा राहील यासाठी सतत जन प्रबोधन, मार्गदर्शन, मेळावे, व्याख्याने या मार्गाने गोखळी एक आदर्श गाव बनविण्यात इतरांसमवेत राजेंद्र भागवत व कुटुंबीयांनी समर्थ भूमिका निभावली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी पाक्षिक महामित्रचे संपादक दशरथ फुले, महाराष्ट्र माळी महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ननावरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, जाधववाडी ग्रामपंचायत माजी सरपंच व विद्यमान सदस्य मुनीश जाधव, बाजार समिती संचालक परशुराम फरांदे, शिवाजी भुजबळ, विकास नाळे, संदीप नाळे, प्रा. संपतराव शिंदे, उदयकुमार नाळे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, तुकाराम गायकवाड, बापूराव काशीद, अरविंद राऊत यांच्या सह ओबीसी समाज बांधव आणि शहर व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी राजेंद्र बोराटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाचे स्वरुप विषद केले. मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. बाळासाहेब ननावरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य करण्यात आल्याने सर्वांनी त्याचे काटेकोर पालन केले.