
स्थैर्य, सातारा, दि. 10 ऑगस्ट : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पहाणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगर पालिकेने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे असे कौतुक करुन गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पहाणी प्रसंगी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह नगर पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
अमृत भारत योजनेतून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी मिळावा यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही प्रयत्न केले. सातारा शहर सिटी ऑफ गार्ड करण्याचा प्रयत्न असून उद्यानांमध्ये सैन्याने वापरलेली विमाने, रणगाडे ठेवण्याचा मानस असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
अमृत भारत योजनेतून या गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाला निधी मिळाला आहे. सुशोभीकरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.