स्थैर्य, पाचगणी, दि. 20 : रविवारी उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्ट मध्ये आणखी आठ जण बाधित आल्याने बाधित व्यक्तींची संख्या 20 वर पोहचली आहे. बाधितांची आणखी भर पडल्याने गोडवलीकरांच्या मनामध्ये भीतीचा थरकाप उडाला आहे. आज पुन्हा सात जणांचे स्त्राव घेण्यात आले असून उद्या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेतले जाणार आहेत. त्यामुळे गोडवली येथील गावकर्यांचा भीतीने श्वास गुदमरला आहे.
गोडवली, ता. महाबळेश्वर येथील बाधित व्यक्तींची मालिका खंडित होण्याऐवजी वाढतच चालली आहे. दोन दिवसांपूर्वी बाधित व्यक्तींची संख्या बारा होती. रविवारी उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये आठ बाधितांची भर पडली आहे. यामध्ये 1 वर्ष, 2, वर्षे वयाच्या मुली आहेत, तर 20, 22, 25, 40, 50 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 20 वर पोहोचली आहे.
गोडवली येथील बाधितांची संख्या वाढत असल्याने दांडेघर, आंब्रळ, खिंगर, राजपुरी परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच या गावांतील काही व्यक्ती अंत्यविधीसाठीसुद्धा गेल्या होत्या. अशा व्यक्ती आजही भीतीने घरातच आहेत. प्रशासनाला बाधितांची साखळी तोडण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढे येत प्रशासनास मदत करणे गरजेचे आहे तरच गोडवली येथील बाधितांची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर भिलार येथील पाच व्यक्तींना दि. 17 जुलै रोजी स्त्राव घेण्याकरिता विलगीकरणात घेतले असून आज चार दिवस होऊन सुद्धा अहवाल अजून प्रलंबित आहे. गोडवलीमध्ये बाधितांची संख्या वाढत असल्याने वाढणार्या बाधितांच्या संख्येला ब्रेक लावत हॉटस्पॉटच्या दिशेने होणारी वाटचाल रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.