
दैनिक स्थैर्य । 28 जुलै 2025 । सातारा । माण, ता. येथील वाघमोडेवाडी व कोकरेवाडी (पिंगळी बुद्रुक) या गावातून अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दहिवडी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मध्यरात्रीवाघमोडेवाडी येथील चैतन्य सुभाष मडके यांचे पाहणे माधवराव कोंडी कोकरे रा. कोकरेवाडी पिंगळी बुद्रुक यांच्या घरासमोरील गोठ्यातून ३३ हजार रुपये किमंतीच्या ४ मोठ्या शेळ्या व तीन लहान करडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस घरासमोरील गोठ्यातून शेळ्या चोरून नेल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरीची माहिती मिळताच, दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा तात्काळ पंचनामा करून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. लवकरच चोरांना पकडू असे आश्वासन दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिले आहे.