स्थैर्य, नागठाणे, दि. 18 : शेळी तसेच दोन बोकड चोरणाऱ्या दोन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून 41 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकबर बाबासो मुलाणी (रा. नागठाणे ता. सातारा) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या घराशेजारी बांधलेल्या बंदीस्त शेडचे कुलूप तोडुन अनोळखी चोरट्यांनी बीठ जातीचे दोन बोकड तसेच शेळी पळविल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिस मनोहर सुर्वे व स्वप्नील माने यांना संशयितांबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिस पथकाने सापळा लावून संभाजी बबन जाधव (वय 35) व योगेश दत्तात्रय गायकवाड (वय 22, दोघेही रा. अतित ता. सातारा) या संशयीताना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, मनोहर सुर्वे, रामचंद्र फरांदे, स्वप्नील माने, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.