दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर आणि तालुक्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करून बकरी ईद साजरी केली. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र येत घरात किंवा टेरेसवरती नमाज पठण केले. त्यामुळे मशीद परिसरात शुकशुकाट होता.
शासनाच्या नियमानुसार सामूहिकरीत्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर असलेल्या बंदीचे समाजबांधवांकडून पालन करण्यात आले. त्यामुळे ईदगाह मैदानावर होणार्या बकरी ईदच्या नमाज पठणाचा सामूहिक सोहळा रद्द करण्यात आला होता.
बकरी ईदनिमित्ताने कुर्बान केलेल्या बकर्याचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब घटक किंवा नातेवाईकांना देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. मात्र यावर्षी सार्वजनिक नमाज पठण होऊ शकले नाही. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्याचे प्रमाण देखील कमी झाले असल्याचे पाहायला मिळाले.