खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथे वादळी पावसात वीज पडून शेळीचा मृत्यू; पशुपालकाचे मोठे नुकसान


खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक (माने वस्ती) येथे काल वादळी पावसात वीज पडून लहू हनुमंत माने यांच्या मालकीच्या शेळीचा मृत्यू झाला. लोणंद पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २ एप्रिल : खंडाळा तालुक्यातील मौजे खेड बुद्रुक येथे काल (बुधवारी) दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून एका शेळीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या नैसर्गिक संकटामुळे संबंधित गरीब पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथील माने वस्तीवर राहणारे पशुपालक लहू हनुमंत माने यांच्या मालकीची ही शेळी होती. काल दुपारी अचानक हवामानात बदल होऊन परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान माने वस्ती परिसरात अचानक वीज कोसळल्याने लहू माने यांच्या शेळीचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच लोणंद पशुवैद्यकीय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन काकडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि मृत शेळीचा व झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा केला.

सध्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले असून, शेतीपिकांसह पशुधनाचेही नुकसान होत आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे लहू माने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाने व शासनाने त्यांना तातडीने योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व शेतकरी वर्गातून केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!