दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । रत्नागिरी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार जणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योग विभाग व शासन काम करीत आहे. २५ हजार जण नवउद्योजक असावेत असेही नियोजन आहे असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. 2 दिवसीय निर्यात परिषद व प्रदर्शन उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.
येथील अरिहंत मॉलमधील टिळक सभागृहात याचे उद्घाटन झाले. राज्याचा उद्योग विभाग, संचालक उद्योग, लघुव्यवसाय विकास बँक (सिडबी) आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत ही परिषद आणि 2 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, उद्योग सहसंचालक एस.आर. लोंढे, सहसंचालक कोकण विभाग सतीश भामरे, सिडबीचे उपमहाव्यवस्थापक रहाटे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
स्टरलाईटची जागा घेणार
स्टरलाईट उद्योग समूहसाठी 500 एकर जागा एमआयडीसीने 1992 मध्ये दिली. त्यावर उद्योग उभारण्यात आलेला नाही. याबाबत शासनाने न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी अद्यापही जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले नाही.
येणाऱ्या 12 ऑक्टोबर रोजी ही प्रक्रिया सुरु होत आहे. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी इतर उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकातील हजारोंना रोजगार मिळेल याबाबत पावलं उचलली जात आहेत.
कोरोना काळात देशातील 4 ठिकाणी ड्रगपार्क (औषध कारखाने ) उभारण्याचा निर्णय झाला याला याआधीच्या सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका बसला व रायगड जिल्हयात एक इंचही जागा उपलब्ध करुन दिली गेली नाही. कुणावरही अवलंबून न राहता हा ड्रगपार्क महाराष्ट्रात होईल याचीही खबरदारी माझा विभाग घेत आहे असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी जिल्हयात काजू आणि आंबा यासाठी विशेष सवलती दिल्या जात आहेत. यात अधिकाधिक जणांना सोबत घेऊन काजू उद्योग क्षेत्र येथे केले जाईल असे सामंत म्हणाले.
कायमस्वरुपी विक्री सुविधा
शहरी व ग्रामीण बचत गटाची उत्पादने दर्जेदार अशीच आहेत त्यांना कायमस्वरुपी विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. मात्र याबाबत गेल्या साडेसात वर्षात राज्यात कोठेही कार्यवाही झालेली नाही. अशा गटांना रत्नागिरीत 21 गाळे येणाऱ्या काळात बांधण्याबाबत नगरपालिकेला सूचित केले आहे. अशी सुविधा निर्माण करणारा रत्नागिरी हा राज्यातला पहिला जिल्हा ठरेल असे ते यावेळी म्हणाले
पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून आज जिल्ह्यातील 5 उद्योजकांच्या हस्ते दीपप्रज्ज्वल करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विद्या कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी एस.के. थोटे यांनी केले.
लगतच स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्धाटन उदय सामंत यांनी फित कापून केले. हे प्रदर्शन आज व उद्या रविवार 25 सप्टेंबर रोजीही सुरु असेल.