स्थैर्य, कोळकी, दि. २३ : कोरोना आपत्तीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये सुमारे दोन महिने बंद असलेले शहरातील व्यवसाय शासनाच्या अटीशर्तींसह सुरु करण्यास मिळालेल्या परवानगीने आज सुरु झाले. यामुळे शहरातील दुकाने सुरु झाली. आज शहरातील प्रमुख बाजारपेठ परिसरात बहुतांश व्यवसाय सुरु होते. ग्राहकांचाही त्याला थोडा फार प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यारस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली होती. परंतु आज सुरु असलेले व्यवसायांवर पुन्हा नविन नियमांची गदा आली तर बंद होतात की काय अशा संभ्रमात व्यावसायिक व नागरिक असून यामुळे काही ठिकाणी काही नागरिकांच्यात जबाबदारीचा अभाव दिसून येत आहे. दुचाकीवर ट्रिपलसिट फिरणे, केवळ गप्पाटप्पांसाठी दुकानांसमोर थांबणे असेही काही प्रकार घडत आहेत. याचेच भान नागरिकांनी राखणे गरजेचे आहे. कारण मीच माझा रक्षक याप्रमाणे स्वत:ची सुरक्षा स्वत:च काळजीपूर्वक करुन प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे फलटण शहर व परिसरातं या आठवड्यात अनेक नागरिक परगावांहून आलेले आहेत. यापुर्वी तालुक्यात आढळलेले कोरोना बाधीत हे परगावांशीच संपर्कात होते. परंतु यांच्या संपर्कामुळे स्थानिक हायरिस्कमध्ये जात आहेत. नागरिक भयभीत होत आहेत. यासाठी परगावाहून आलेल्यांची सविस्तर माहिती प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे. जागरुक नागरिकांनी याबाबत सहाकार्य करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे वृध्द व दहा वर्षांखालील मुले यांना बाहेर रस्त्यावर आणू नये असे प्रशासनाचे आवाहन असताना देखील अनेकठिकाणी पालकच लहान मुलांना घेऊन फिरत आहेत व जेष्ठ नागरिकही बिनधास्त रस्त्यावर वावरताना दिसत आहेत. रस्त्यावरील विक्रेत्यांपाशीही गर्दी होत आहे हे टाळणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनीच प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.