शेतकऱ्यांना बांधापर्यंत जाऊन सहकार्य करा – कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम


 

स्थैर्य, नंदुरबार दि. 6: शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन करावे आणि वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प.अध्यक्ष ॲड.सीमा वळवी,  आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना योजनांची माहिती द्यावी. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करावे. गतवर्षीच्या नुकसानीसाठी प्राप्त अनुदानाचे वितरण त्वरीत करण्यात यावे. रानभाजी महोत्सव आदिवासी बांधवांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आला असून त्यात सातत्य ठेवावे, असे त्यांनी सांगितले. नर्सरी तयार करणे आणि वृक्ष लागवडीच्या उपक्रमात कृषी विभागाचाही सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

डॉ.कदम यांनी सार्वजनिक वितरण प्रणाली, सामाजिक न्याय आणि सहकार विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत  50 हजार नवीन लाभार्थ्यांचा समावेश मोहिम स्तरावर केल्याबद्दल त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. स्वस्त धान्य दुकानावर अपंग, वयोवृद्ध आणि महिलांना रांगेत प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती देण्यात  यावी आणि त्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी कार्ययोजना सादर करावी, असे निर्देश त्यांनी दिले. मंत्रालय स्तरावरील बैठकीतदेखील शेतकऱ्यांना आवश्यकता असताना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे डॉ.कदम म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचादेखील आढावा घेण्यात आला. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्याने चांगले उपाय योजून संसर्ग नियंत्रित ठेवला असल्याचे नमूद करून त्यांनी त्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि जिल्ह्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्याने संकटकाळात मनरेगाच्या माध्यमातून 64 हजार नागरिकांना एकाचवेळी रोजगार उपलब्ध करून दिला. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत वेळेत अन्नधान्य वाटप करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला अशी माहिती त्यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!